मुंबई : राज्यात सत्ताधारी आघाडीच्या ६० पेक्षा अधिक उमेदवारांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलेल्या प्रकरणांबाबत पालिका आयुक्तांकडून अहवाल मागवण्यात आले आहेत, अशी माहीती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. उमेदवारांवर कोणताही दबाव आणला गेला होता का?, उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांना काही प्रलोभने दिली गेली होती का?, याबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झाली होती का? आणि उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या स्पर्धकांनी स्वेच्छेने तसे केले होते का? यासह विशिष्ट मुद्द्यांवर अहवाल मागवण्यात आले असल्याचे ते म्हणाले. बिनविरोध निवडणुकांसंदर्भात पालिका आयुक्तांकडून अहवाल मागवण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर या विषयावर निर्णय घेतला जाईल. राज्यातील दुबार मतदारांची अंतिम संख्या १०.३२ लाख आहे, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेत मतदार यादीतील अशा नावांसंबंधी सुमारे १.२० लाख प्रकरणे प्रलंबित आहेत, असे वाघमारे यांनी पत्रकारांना सांगितले. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (३० डिसेंबर) अनेक महानगरपालिकांमध्ये वाद आणि आरोप झाले. ज्यामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी आर्थिक प्रलोभने आणि धमक्या दिल्याचा आरोप केला होता.