Nusrat Bharucha : ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’; नुसरुत भरुचाची अपघातानंतर पहिली पोस्ट, हॅास्पिटलमधील फोटो केला शेअर
Nusrat Bharucha : नुसरतने इन्स्टाग्रामवर हॉस्पिटलमधील खोलीतून व्हीलचेअर आणि मावळत्या सूर्याचा सुंदर फोटो शेअर केला आहे.

Nusrat Bharucha Health Update : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बाली येथे झालेल्या अपघातात पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर नुसरतवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रकृतीबाबत अपडेट दिले आहे.
शस्त्रक्रियेनंतर नुसरतची पहिली पोस्ट चर्चेत
नुसरतने इन्स्टाग्रामवर हॉस्पिटलमधील खोलीतून व्हीलचेअर आणि मावळत्या सूर्याचा सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने आपला सकारात्मक दृष्टिकोन आणि जिद्द व्यक्त केली आहे. ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ असे म्हणत तिने आयुष्यातील हा कठीण प्रसंगही धैर्याने सामोरे जाण्याचा संदेश दिला आहे.
“मी नेहमीच सूर्यास्ताचा पाठलाग करते आणि बघता बघता माझं दृश्य बदललं. पण चित्र अजूनही तिथेच आहे, कारण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त,” असे पोस्टमध्ये नुसरतने म्हटले आहे.
बालीतील अपघातात पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर
नुसरत भरुचा वैयक्तिक कामानिमित्त आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाली येथे गेली होती. मात्र, तिथे तिचा अपघात झाला आणि तिच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली. पुढील उपचारांसाठी तिला एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आले. तिच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याच्या वृत्तामुळे चाहते चिंतेत होते. आता शस्त्रक्रियेनंतर तिने शेअर केलेल्या पोस्टमुळे तिच्या प्रकृतीबाबत चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
टायगर श्रॉफसोबत दिसणार नुसरत
नुसरतच्या आगामी चित्रपटांबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ती शेवटची ‘उफ्फ ये सियापा’ या चित्रपटात दिसली होती. आता ती अभिनेता टायगर श्रॉफसोबत एका मोठ्या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याची चर्चा आहे.






