Municipal Result : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालांमध्ये काही निकालांनी सर्वांनाच धक्का दिला आहे. तुरुंगात असतानाही निवडणूक लढवलेल्या चार उमेदवारांनी विजय मिळवत राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. पुणे, सोलापूर आणि जळगाव महापालिकेतील हे निकाल सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. पुण्यात आंदेकर भगिनींचा धक्कादायक विजय पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी थेट तुरुंगातून निवडणूक लढवत विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीत लक्ष्मी आंदेकर यांनी अवघ्या 174 मतांनी बाजी मारली. तुरुंगात असतानाही आंदेकर भगिनींना मिळालेला जनतेचा कौल हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपांमुळे आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिल्याचा मुद्दा वादग्रस्त ठरला आहे. यावर प्रतिक्रिया देताना आंदेकर कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन महिलांना राजकारणात लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे. सोलापुरात हत्या प्रकरणाच्या सावलीत भाजपचा क्लीन स्वीप सोलापूर महापालिकेतील प्रभाग क्रमांक 2 हा मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येमुळे आधीच चर्चेत होता. निवडणुकीपूर्वी झालेल्या या हत्येने वातावरण तापले होते. मात्र निकालात भाजपने चारही जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. विजयी उमेदवारांमध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख, कल्पना कारभारी, नारायण बनसोडे आणि शालन शिंदे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शालन शिंदे या हत्येच्या आरोपाखाली कायदेशीर कारवाईला सामोरे जात असतानाही विजयी ठरल्या आहेत. जळगावातून जेलमधून लढलेले माजी महापौर विजयी जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) चे माजी महापौर ललित कोल्हे यांनी कारागृहातून निवडणूक लढवत विजय मिळवला आहे. बोगस कॉल सेंटर प्रकरणात अटकेत असलेले ललित कोल्हे सध्या नाशिक कारागृहात आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत ललित कोल्हे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव पियुष कोल्हे हे देखील विजयी झाले असून, पिता-पुत्राचा विजय चर्चेचा विषय ठरत आहे. निकालानंतर कोल्हे कुटुंबीयांनी जल्लोष साजरा केला. तुरुंगातून निवडणूक लढवून मिळालेला हा जनादेश लोकशाहीतील विरोधाभास अधोरेखित करणारा असून, राजकारणातील जनाधार, स्थानिक प्रभाव आणि मतदारांची मानसिकता यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.