संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांनी दिला इशारा
संयुक्तराष्ट्रे – करोनामुळे संपूर्ण जग अडचणीत आले असून जगापुढे ज्या गंभीर समस्या यामुळे निर्माण झाल्या आहेत त्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही निर्माण झालेल्या नव्हत्या. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धापेक्षाही भयंकर स्थितीला आपल्या सर्वांना सामोरे जावे लागणार असून त्यात आर्थिक मंदीच्याही मोठ्या समस्येला आपल्याला झुंजावे लागणार आहे असे संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्टेनिओ गुटेर्रेस यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, रोगाच्या प्रसाराच्या संकटाबरोबरच आर्थिक संकटही मोठे असल्याने त्यातून जगभरात अनेक ठिकाणी अस्थैर्य, अस्वस्थता, आणि संघर्षाची स्थिती निर्माण होणार आहे. करोनाचा आर्थिक व सामाजिक दुष्परिणाम या विषयावरील एका अहवालाचे त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते. या गंभीर आव्हानाला सामोरे जाण्यासाठी संपुर्ण जगातून अधिक परिणामकारक प्रयत्न केले जाण्याची गरज आहे. या समस्येमुळे सारी मानवजमातच अडचणीत आले असून आता आपल्याला सारे जुने राजकारण दूर सारून एक यावे लागणार आहे.
संयुक्तराष्ट्रांच्या गेल्या 75 वर्षांच्या इतिहासात अशा अभुतपुर्व प्रसंगाला तोंड देण्याची वेळच आली नव्हती असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे. हा केवळ आरोग्याचा प्रश्न नसून संपुर्ण मानवजातीपुढीलच समस्या आहे असेही त्यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून संपुर्ण जगाला या महामारीच्या उपाययोजनांविषयी मार्गदर्शन आणि समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.