कराडातील 766 घरांमध्ये सापडल्या डासांच्या अळ्या

सुनीता शिंदे
पालिका प्रशासन कायमस्वरूपी राबविणार सर्वेक्षण मोहीम
कराड – सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे डासांच्या प्रमाणात वाढ होऊन शहरातील नागरीक ताप व डेंग्यूसदृश साथीने हैराण झाले होते. दोन ते तीन महिन्यात या साथीमुळे दोघांना आपला जीवही गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर कराड नगरपालिका व नागरी आरोग्य विभागाच्यावतीने गत दहा ते बारा दिवसांपासून शहरात घरोघरी
सर्वेक्षण मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत शहरातील एकूण 8648 घरांची तपासणी करण्यात आली. पैकी 766 घरांमध्ये डासांच्या अळ्या सापडल्याचे सर्वेक्षणांतर्गत समोर आले आहे. तर तापाने आजारी असणाऱ्या एकूण 7 रूग्णांचे नमुने तपासले असता त्यातील दोघांना डेंग्यू झाल्याचे आढळले असल्याचे नागरी आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान ही मोहीम कायमस्वरूपी राबविण्यात निर्णय घेण्यात आला आहे.
सततच्या पावसाने ठिकठिकाणी पाण्याचे साठे राहिल्याने शहरात डासांच्या प्रमाणात वाढ झाली होती. पालिका प्रशासनाकडून प्राथमिक खबरदारी म्हणून सतत जंतूनाशक फवारणी केली जात होती. मात्र डासांचे प्रमाण वाढतच असल्याचे लक्षात आले. येथील बुधवार पेठेतील एका आठ वर्षीय मुलीला गत पंधरा दिवसांपूर्वी डेंग्यूमुळे आपला जीव गमवावा लागला. यावर शहरातील काही सुजाण नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर पालिकेला जाग आली. नागरी आरोग्य विभागाच्या मदतीने शहरात घरोघरी डेंग्यू प्रतिबंधात्मक चळवळ व सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली.
पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रीन टीम व नागरी आरोग्य विभागाचे कर्मचारी शहरात घरोघरी डेंग्यूच्या साथीची माहिती व शहरातील पाणी साठ्यांची तपासणी करताना दिसत आहेत. या सर्वेक्षणांतर्गत जास्तीत जास्त घरांमध्ये फ्रीजच्या पाठीमागे साठणाऱ्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या सापडल्याने पालिकेने डासांच्या वाढत्या प्रमाणाला नागरिकानांच जबाबदार धरले.
सध्या बारा लोकांचे पथक शहरात सर्वेक्षण मोहीम राबवित आहेत. प्रत्येक पथकाकडून शहरातील 40 ते 50 घरांची पाहणी करण्यात येत आहे. बुधवार दि. 6 नोव्हेंबरपासून या मोहिमेला सुरूवात झाली. यामध्ये गत दहा दिवसांत शहरातील 8648 घरांची तपासणी करण्यात आली. पैकी 766 घरांमध्ये डासांच्या आळ्या सापडल्या. तर या घरांमधील 831 भांडी रिकामी करण्यात आली. तर काही भांड्यामध्ये जंतूनाशक फवारणी करण्यात आली.
कराड शहरातील सहा मुख्य पेठा व त्रिशंकू भागात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त डासांचे प्रमाण असणाऱ्या बुधवार पेठ, बारा डबरे व सूर्यवंशी मळा या परिसरातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तर शनिवार पेठ, सोमवार पेठ व कार्वे नाका परिसरात सर्वेक्षण करणे अजून बाकी आहे.
यावर्षीची परिस्थिती पाहता नागरी आरोग्य विभाग व पालिकेच्या वतीने कायमस्वरूपी ही मोहीम सुरू ठेवण्यात निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात जास्तीत जास्त स्वच्छता ठेवावी, पाण्याचे साठे करू नयेत असे आवाहन केले आहे.





