जेवढी टीका होईल, तेवढी माझी मते वाढणार

अवसरी येथे दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्‍त केला विश्‍वास

मंचर – गेल्या 30 वर्षांत दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्‍यात काय कामे केली, अशी टीका माझ्यावर केली जाते; परंतु टीका करणारे शिवाजीराव आढळराव हे 15 वर्षे, अरुण गिरे हे 25 वर्षे व सध्याचे विरोधी उमेदवार राजाराम बाणखेले हे 14 वर्षे माझ्या शेजारी बसत होते. त्यांना मी काय केले हे कळले का नाही, हा प्रश्‍न मला पडला आहे. जेवढी वैयक्तिक टीका विरोधक माझ्यावर करतील, तेवढी माझी मते वाढतील, असा विश्‍वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्‍त केला.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे महाआघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. याप्रसंगी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, बाळासाहेब बाणखेले, रामदास बाणखेले, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात, पंचायत समिती सदस्य संतोष भोर, सरचिटणिस शरद शिंदे, दत्ता थोरात, जे. के. थोरात, मथाजी पोखरकर, गणपतराव इंदोरे, डी. एम. शिंदे, आनंद शिंदे, सुषमा शिंदे, निलेश थोरात, अल्लू इनामदार, युवराज बाणखेले, मंगेश बाणखेले, सरपंच संगिता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आपला विजय निश्‍चित आहे; परंतु एक लाख मताधिक्‍याने निवडून देणार असा निर्धार कार्यकर्त्यानी केला आहे. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. प्रत्येक बुथमधून 75 टक्‍के मतदान व्हायला हवे. नियोजन केले तर हे शक्‍य होऊन महाविजय साकारता येणार आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. यावेळी राजू इनामदार, प्रभाकर बांगर, विष्णू हिंगे, शरद शिंदे, राजू भोर, शकुंतला शिंदे, कल्याण शिंदे, निलेश टेमकर, तुषार टेमकर, संजय वायाळ यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन जगदिश अभंग यांनी केले.

असा प्रामाणिक माणूस शोधून सापडणार नाही
शिवसेनेच्या उमेदवाराने ज्या नेत्यांचे फोटो लावून मते मागण्यास सुरुवात केली, यांनीच त्या काळात स्व. शिवाजीराव बेंडे , किसनराव बाणखेले यांना कशा प्रकारची वागणूक दिली, हे जनतेला माहीत आहे. राष्ट्रवादी पक्षानेही काही कमी केले नाही. रयत शिक्षण संस्था, उपजिल्हा रुग्णालय, यामध्ये सदस्य म्हणून संधी दिली; परंतु त्यांनी आता जाहीर केले की मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असताना एकदा देखील पक्षाला मतदान केले नाही. असा प्रामाणिक माणूस शोधून सापडणार नाही, असा टोला वळसे पाटील यांनी लगावला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.