प्रभात वृत्तसेवा पुणे – मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात थंडीची लाट आली असून, अहिल्यानगर येथे हंगामातील सर्वात कमी ६.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यातही थंडीची लाट आली असून, किमान तापमान ८ ते ९ अंशांपर्यंत खाली नोंदविले आहे. राज्यातील थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत असून, ४८ तासांत किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाली आहे. त्यामुळे १० ते ११ अंशांवरील किमान तापमान ८ ते ९ अंशांपर्यंत खाली आले, तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, जळगाव जिल्ह्यांत पारा ६ ते ७ अंशांपर्यंत खाली आल्यामुळे राज्यातील अहिल्यानगर, पुणे, जळगाव, मालेगाव, नाशिक गारठले आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया, वर्धा, अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांसह मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील किमान तापमान ९ अंशांच्या खाली नोंदविले आहे. परिणामी या जिल्ह्यांत थंडीची लाट आली असून, कडाक्याच्या थंडीने जिल्हे गारठले आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवसांत राज्यातील हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहील. किमान तापमानात काही अंशी घट होण्याची शक्यता असून, काही जिल्ह्यांत थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील किमान तापमान अहिल्यानगर ६.६, जळगाव ७, पुणे ७.९, गोंदिया ८, नागपूर ८.१, नाशिक ८.२, मालेगाव ८.८, वर्धा ९.९, सातारा, यवतमाळ आणि अकोला १०, धाराशिव आणि अमरावती १०.२, परभणी १०.४, छत्रपती संभाजीनगर आणि चंद्रपूर १०.८, वाशिम ११, महाबळेश्वर ११.१ अंश सेल्सिअस.