पुणे -कसबा पोटनिवडणूक निकालानंतर कॉंग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजप पदाधिकारी यांच्यात वादाचे खटके उडत आहेत. महापालिकेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी बैठक बोलविण्यात आली होती. त्यास सहा आमदारांनाही निमंत्रित करण्यात आले. मात्र, बैठकीत भाजपचे माजी पदाधिकारीच बोलत असल्याचे सांगत; आमदार धंगेकर बैठकीतून निघून गेले. तसेच ही बैठक पुणेकरांच्या प्रश्नांची होती की भाजपच्या पदाधिकाऱ्यांची असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यापुढे पालकमंत्र्यांनी थेट जनतेत बैठक घ्यावी, असा टोलाही धंगेकर यांनी लगावला.
महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी बैठक बोलविली होती. या बैठकीस आमदारांसह भाजपचे माजी गटनेते गणेश बिडकरदेखील उपस्थित होते. बैठक सुरू होताच बिडकर यांनी बोलण्यास सुरूवात केली. तसेच प्रशासनाकडे विचारणा केली. मात्र, बिडकरच बैठकीत बोलत असल्याचे दिसताच धंगेकर बैठकीतून निघून गेले. बिडकर सध्या पदाधिकारी नाहीत. तसेच ही बैठक भाजपची नव्हती. त्यामुळे आपण बैठकीतून निघून गेल्याचा खुलासा धंगेकर यांनी केला आहे.
तर निषेध करून जायचे
“धंगेकर नाराज आहेत किंवा नाहीत, याची आपल्याला काही माहिती नाही. ते बैठकीतून अचानक निघून गेले आहेत. जायचे होते, तर त्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त करायला हवी होती. मला कल्पना देऊन जायचे होते,’ अशी प्रतिक्रिया पालकमंत्री पाटील यांनी बैठकीनंतर दिली. “ज्या प्रकल्पांची आढावा बैठक बोलविण्यात आली, ते सर्व प्रकल्प बिडकर हे महापालिकेचे सभागृहनेते असतानाचे आहेत. त्यामुळे त्यांना या विषयाची माहिती असल्याने त्यांना बोलण्यास दिले,’ असेही पाटील म्हणाले.