Wagholi News : ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी वाघोलीत बैठक यशस्वी; आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांची माहिती
Wagholi News : महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा गौरव वाढवणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या आयोजनासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

वाघोली : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व रामकृष्ण कर्तव्य फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी २०२५-२६ स्पर्धेच्या निमित्ताने श्रेयस गार्डन मंगल कार्यालय, वाघोली येथे बैठक उत्साहात पार पडली.
या बैठकीत स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना, जबाबदाऱ्यांचे वाटप, नियोजनाची रूपरेषा तसेच आवश्यक सुविधा व व्यवस्थापन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी नियोजनाचे प्राथमिक सादरीकरण सर्वांच्या समोर केले. यावेळी अनेकांनी आपला अभिप्राय व सूचना मांडल्या. उपस्थित मान्यवरांनी आपले मौल्यवान मार्गदर्शन करून स्पर्धा भव्य आणि यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
ही स्पर्धा वाघोलीकरांसाठी ऐतिहासिक क्षण असून, वाघोलीच्या नावलौकिकात भर पडावी यासाठी आम्ही सर्व वाघोलीकर अत्यंत जोमाने ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडू, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीस विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा गौरव वाढवणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या आयोजनासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.





