रोम – इंटर मिलान व फ्लोरेन्टिना यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटल्यामुळे गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या युवेंट्स संघाचे सिरीज ए फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद जवळपास निश्चित झाले आहे.
या स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या लढतीत इंटर मिलान व फ्लोरेन्टिना संघात गोलशून्य बरोबरी झाली. हा सामना इंटरने जिंकला असता तर युवेंट्स संघाला विजेतेपदासाठी झगडावे लागले असते. त्यांचे गुणतालिकेत 34 सामन्यांतून 80 गुण झाले आहेत. इंटरने हा सामना जिंकला असता तर त्यांनाही या स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्याची संधी निर्माण झाली असती. त्यांनी गुणतालिकेत 35 सामन्यांतून 73 गुण नोंदवले असले तरी या सामन्यात बरोबरी झाल्यामुळे त्यांना अटलांटानंतर तिसरे स्थान मिळाले आहे.
इंटरने 35 सामन्यांतून 21 विजय मिळवले आहेत. तर, युवेंट्सने 34 सामन्यांतून 25 विजयांची नोंद केली आहे. त्यामुळे गुणतालिकेतील आघाडी व विजयाचे सरस समीकरण यांमुळे युवेंट्सचे विजेतेपद जवळपास निश्चित झाले आहे. अर्थात, त्यांना साखळीतील आणखी एक सामना खेळायचा असून त्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले तर त्यांच्या या स्पर्धेच्या सलग नवव्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब होणार आहे.