डिंभे धरणाचा हुतात्मा बाबू गेनू सागर उल्लेख करावा

मंचर – डिंभे धरणाचा हुतात्मा बाबू गेनू सागर या नावाने शासकीय आदेशानुसार उल्लेख करावा, अशी मागणी हुतात्मा बाबु गेनू युवा प्रतिष्ठाणचे बाबाजी चासकर आणि प्रा. वसंत भालेराव यांनी केली आहे. तसेच या संदर्भातील निवेदन त्यांनी कृष्णा खोरे महामंडळाचे मुख्य अभियंता विजय रजपूत यांना दिले आहे.

महाळुंगे पडवळ गावचे सुपुत्र हुतात्मा बाबू गेनू यांनी देशासाठी प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून राज्य सरकारने डिंभे धरणाचे हुतात्मा बाबू गेनू सागर असे नामकरण जानेवारी 1996 रोजी केले. हुतात्मा बाबू गेनू सागर असे नामकरण होण्यासाठी प्रा. वसंत भालेराव यांनी तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या ठरावांच्या प्रती गोळा करुन शासनाला पाठवून शासनाशी सतत पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर आंबेगाव-जुन्नर तालुक्‍यांना वरदान ठरलेल्या डिंभे धरणाच्या माहिती संदर्भात डिंभे धरण बाबू गेनू सागर असा उल्लेख सरकारने काढलेल्या अद्यादेशामध्ये करण्यात आला आहे. तरीही अद्याप याचा उल्लेख डिंभे धरण असा केला जात आहे. पावसाळ्यात जलसंपदा विभागाकडून वृत्तपत्रांना धरण साठ्याची माहिती देताना बाबू गेनू सागर असा उल्लेख करण्यात येत नाही. त्यामुळे सर्व ठिकाणी जलसंपदा विभागाने माहिती देताना हुतात्मा बाबू गेनू सागर या नावाचा उल्लेख करावा, अशी मागणी प्रतिष्ठानचे बाबाजी चासकर व प्रा. वसंत भालेराव केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.