मंचर : मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर मंचर बाजारपेठेत सध्या मोठी चैतन्यपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. संक्रांतीसाठी महत्त्वपूर्ण मानले जाणारे सुगडे, तिळगुळ, पतंग, दोर यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. बाजारपेठेत विविध प्रकारच्या सुगड्यांनी दुकाने सजली असून पारंपरिकतेसोबत आधुनिक रंगसंगतीही पाहायला मिळत आहे. मंचर येथील विक्रेत्या कांता रोहिदास सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार मातीचे सुगडे पाच नग तीस रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच पीओपी व रंगीत साहित्यापासून तयार करण्यात आलेले सुगडे पाच नग पन्नास रुपयांना विकले जात आहेत; मात्र यावर्षी मातीच्या सुगड्यांची संख्या तुलनेने कमी असल्याचे चित्र आहे. माती सहज उपलब्ध न होणे, तसेच कुंभार व इतर पारंपरिक कारागिरांची संख्या घटत चालल्याने मातीच्या सुगड्यांचे उत्पादन कमी झाले आहे. कारागिरांची वाणवा, वाढलेला खर्च आणि तरुण पिढीचा पारंपरिक व्यवसायाकडे कमी होत असलेला ओढा यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तरीही नागरिक पारंपरिक मातीच्या सुगड्यांना प्राधान्य देत खरेदी करत असल्याने बाजारपेठेत संक्रांतीचा उत्साह टिकून आहे.