लोणी काळभोर -हवेली तालुक्यात कंटेन्मेंट (प्रतिबंधित क्षेत्र) झोनऐवजी मायक्रो कंटेन्मेंट झोन शनिवारी (दि. 25) सायंकाळी करण्यात आले असून, त्यामुळे मायक्रो कंटेन्मेंट झोन वगळता उर्वरीत भागातील सर्व प्रकारची दुकाने व व्यवहार रविवार (दि. 26) पासून सकाळी नऊ ते सायंकाळी सहा दरम्यान सुरू करण्यास हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी परवानगी दिली आहे.
मायक्रो कंटेन्मेंट झोन हद्दीत; मात्र अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित व्यवहार पूर्वीप्रमाणेच बंद राहणार आहेत. हद्दीत अत्यावश्यक सेवाही केवळ सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान चालू ठेवता येणार आहेत. दरम्यान पुनर्रचनेमुळे व्यवहार सुरू होणार आहेत. 32 गावांमध्ये 94 कंटेन्मेंट झोन तयार केले आहेत. त्यामुळे बाधित असलेला परिसर बंद करून इतर ठिकाणी व्यवहार सुरू ठेवण्यात येणार आहेत.
कंटेन्मेंट झोन पूर्ण ग्रामपंचायत हद्दीत लागू केल्याने, अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रकारचे व्यवसाय बंद ठेवावे लागत होते. यामुळे सर्वसामान्य नागरिक व व्यापारी, उद्योजक यांचे मोठे नुकसान होत होते. यातून मार्ग काढण्यासाठी कंटेन्मेंट झोनची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. करोना बाधित रुग्ण आढळून आलेला भागच अथवा इमारतच यापुढील काळात मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून प्रतिबंधित करण्यात येणार आहे.
-सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी हवेली,