- कोविडमुळे आता महापालिकेत 50 टक्के कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती
पिंपरी – महापालिकेमध्ये “गट-अ’ आणि “गट-ब’ मधील अधिकारी वगळता अन्य कर्मचारी वर्गाची दैनंदिन उपस्थिती ही 50 टक्के मर्यादेत ठेवण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोविड-19 च्या प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य आणि इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/कर्मचारी वगळता महापालिकेच्या अन्य सर्व कार्यालयांतील अधिकारी/कर्मचारी यांना दैनंदिन उपस्थिती 50 टक्के ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार रोटेशन पद्धतीने कर्मचाऱ्यांची कार्यालयातील 50 टक्के उपस्थिती निश्चित करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आवश्यक ती उपाययोजना करावी. “गट-अ’ आणि “गट-ब’ मधील अधिकाऱ्यांची उपस्थिती मात्र एकूण पदसंख्येच्या 100 टक्के राहील. कर्मचाऱ्यांच्या 50 टक्के उपस्थितीचे आदेश आपत्कालीन, अति महत्त्वाचे व अत्यावश्यक सेवेसाठी (पाणीपुरवठा, विद्युत, रुग्णालये, आरोग्य, वैद्यकीय) तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी लागू राहणार नाही. हे आदेश महापालिका अधिनस्त सर्व कार्यालयांना लागू राहतील.
गर्भवती महिला तसेच अवयव प्रत्यारोपण केलेले, केमोथेरपी, इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी घेत असलेले अधिकारी/कर्मचारी कार्यालयामध्ये उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. तसेच, 24 एप्रिल 2020 च्या आदेशानुसार दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांना कार्यालयात कामकाज करण्यासाठी उपस्थित राहण्यापासून देण्यात आलेली सवलत पुढील आदेश होईपर्यंत कायम राहील. तथापि, जे दिव्यांग कर्मचारी स्वेच्छेने कार्यालयात उपस्थित राहू इच्छितात त्यांना परवानगी देण्यात येणार आहे.