कृष्णा नदीवरील प्रमुख धरणे

पुणे – दक्षिण भारतातील एक महत्त्वाची नदी म्हणून ओळखली जाणारी कृष्णा नदी सातारा जिल्ह्यातील महादेवाच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या महाबळेश्‍वर येथून उगम पावते. ही दक्षिणवाहिनी नदी सुमारे 1200 किमीचा प्रवास करुन तेलंगण राज्यातील कृष्णा जिल्ह्यात हिंदी महासागराला मिळते. महाबळेश्‍वरातूनच उगम पावत असलेली कोयना नदी ही कृष्णची महाराष्ट्रातील सर्वात मोठी उपनदी आहे. कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या चार राज्यांचा पाणी प्रश्‍न सोडवते. या नदीवरील आणि तिच्या उपनद्यांवरील काही महत्त्वाची धरणे अशी आहेत.

कोयना धरण
सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्‍यात हेळवाकजवळ बांधण्यात आलेले कोयना धरण हे महाराष्ट्रातल्या मोठ्या धरणांपैकी एक महत्त्वाचे धरण आहे. तब्बल 105 टीएमसी पाणीसाठा असलेल्या शिवाजीसागर जलाशयाची व्याप्ती ही साधारणपणे 400 चौकिमी इतकी मोठी आहे. महाबळेश्‍वला उगम पावणाऱ्या या नदीच्या पाण्याचा फुगवटा महाबळेश्‍वरच्याच पायथ्याशी असलेल्या तापोळ्यापर्यंत आहे. कोयना हे जलविद्युत निर्मितीचे मोठे केंद्र असून इथे सहा टप्प्यात सुमारे 2100 मेगावॅट्‌स वीजनिर्मिती केली जाते. त्यामुळे या धरणाच्या पाण्याचा सिंचनापेक्षा वीजनिर्मितीसाठी सर्वाधिक वापर केला जातो.

2. धोम धरण
महाबळेश्‍वर येथूनच कोयनेच्या बरोबरीने उगम पावलेली कृष्णा नदी पूर्वेकडे दरीत झेपावते आणि वाईच्या दिशेने मार्गक्रमण करते. या वाईजवळ धौम्य ऋषींच्या आश्रमामुळे प्रसिद्ध पावलेल्या धोम गावाजवळ धोम धरण बांधलेले आहे. हे कृष्णेवरील पहिले धरण होय. या धरणाची पाणी साठवण क्षमता 14 टीएमसी असून या धरनातील पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. वाई, सातारा, जावळी, कोरेगाव आणि खंडाळा तालुक्‍यांना या सिंचनाचा लाभ होतो. येथील श्री नरसिंहांचे मंदिर पाहण्याजोगे आहे.

3. हिप्परगी बंधारा
सांगलीमधून बाहेर पडणारी कृष्णा नदी कर्नाटकातील विशालकाय अशा अलमट्टी धरणापर्यंत पोहोचण्यापूर्वी अथणी आणि बेळगावला जोडणाऱ्या भागातला 6 टीएमसीचा हिप्परगी बंधारा कृष्णेच्या महापूरावेळी महत्त्वाची भूमिका बजावतो. साठ हजार एकराच्या परिसरात सिंचनसुविधा पुरवणारा हा बंधारा ऐनापूर आणि हयाळ या डाव्या कालव्यांच्या साखळीने समृद्ध आहे.

4. अलमट्टी धरण
सांगलीमध्ये पाणी भरले की सगळ्यांच्या नजरा लागतात ते अलमट्‌टी धरण कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील निडगुंडी येथे आहे. तब्बल 125 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण 525 फूट उंच आणि 1565 फूट लांब आहे. कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशनकडून येथे वीजनिर्मितीही केली जाते. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने, या धरणाची उंची 519 मीटर्स ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, महाराष्ट्र-कर्नाटक-आंध्र प्रदेश यांच्यातील क़ृष्णा पाणी वाटप लवादाच्या सूचनेनंतर या धरणाची उंची 5 मीटर्सने वाढवायला परवानगी देण्यात आल्याने या धरणाची पाणी साठवण क्षमता 200 टीएमसी पर्यंत गेल्याचे मानले जाते.

5. नागार्जुनसागर धरण
तेलंगणमधील कृष्णेवरील सर्वात मोठे धरण म्हणून नळगोंडा जिल्ह्यातील नागार्जुनसागर धरणाचा उल्लेख केला जातो. मेसनरी पद्धतीने बांधलेले हे जगातले सर्वात उंच आणि मोठे धरण असून याची लांबी 1550 मीटर्स आणि उंची 124 मीटर्स आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 312 टीएमसी इतकी विशाल असून नळगोंडा, सूर्यापेट, कृष्णा, वेस्ट गोदावरी, खम्माम, प्रकाशम आणि गुंटूर जिल्ह्यांना पाणी या धरणातून पुरवले जाते. तसेच या धरणाच्या पाण्यावर सुमारे एक हजार मेगावॅट्‌ वीजनिर्मितीही केली जाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.