मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक राहिला आहे, तरीही भाजप आणि शिंदेंसेनेमध्ये 20 जागांवरुन असलेला तिढा अजुन सुटलेला नाही. दोन्ही पक्षांच्या निश्चित झालेल्या जागांव्यतिरिक्त ज्या 20 जागा शिल्लक आहेत, त्यापैकी काही जागा या शिवसेनेला पाहीजेत. त्यावर भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. शिंदेसेनेला आतापर्यंत 85 ते 87 जागा मिळाल्याचे समोर येत आहे. तर भाजपच्याही 120 च्या वर जागा निश्चित झाल्या आहेत. उर्वरित 20 जागांसाठी आता दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच चढाओढ सुरू आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या घरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. परंतु त्यामधून काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती आहे.