मुंबई: सध्या चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याची लाट आली असतानाच चीनच्या कंपन्यांबरोबर करण्यात आलेले करारही रद्द केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र सरकारने चीनबरोबर अलीकडेच करण्यात आलेले सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे प्रकल्पही रद्द केले आहेत. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ही घोषणा केली आहे. रद्द करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये हेंग्ली इंजिनिअरिंगचा 700 कोटी रुपयांचा प्रकल्प, ग्रेट वॉल मोटर्सचा 3700 कोटी रुपयांचा प्रकल्प, आणि पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटीच्या एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश आहे. चीनने केलेल्या हल्ल्यात 20 भारतीय जवान शहीद झाल्याची जी घटना घडली होती त्याच्या आधीच या प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या संबंधात माहिती देताना सांगितले की, केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर आम्ही हे प्रकल्प थांबवले आहेत. केंद्राशीच पुढील चर्चा करून यावर पुढील निर्णय घेतला जाईल. मागच्याच सोमवारी मॅग्नेटिक महाराष्ट्र 2 ही परिषद झाली होती. ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आलेल्या या परिषदेस चीनचे राजदूत सून विडॉंग हेही उपस्थित होते. महाराष्ट्रातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी या परिषदेत चीनसह दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि अमेरिका या कंपन्यांशी एकूण 12 करार करण्यात आले आहेत. ज्या दिवशी हा करार झाला. त्याच दिवशी गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये सीमा भागात हाणामारी झाली. त्यात भारताचे 20 जवान शहीद झाले तर 75 जवान जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर देशात चिनी मालावर बहिष्कार घालण्याची व चीनच्या कंपन्यांबरोबर झालेले करार रद्द करण्याची लाटच देशात आली. महाराष्ट्रानेही त्यात सहभागी होत चीनला चांगलाच दणका दिला. चीनचे जे प्रकल्प थांबवण्यात आले आहेत त्यातील बहुतेक प्रकल्प हे पुणे जिल्ह्यातील तळेगाव चाकण पट्ट्यातील औद्योगिक वसाहतीत उभारले जाणार होते.