Ranapati Shivray Swari Agra: भव्य रंगमंच, डोळे दिपवणारी रोषणाई आणि ढोल-ताशांच्या गजराने भारावलेल्या वातावरणात जेव्हा भरजरी वस्त्रे, जिरेटोप आणि हातात भवानी तलवार घेतलेले छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर स्वार होऊन अवतरले, तेव्हा उपस्थितांनी एकच जल्लोष केला. निमित्त होते, आगामी ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य मराठी चित्रपटाच्या विशेष सादरीकरणाचे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘शिवराज अष्टक’मधील हे सहावे पुष्प ३० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक आग्रा भेटीचा थरार अनुभवता येणार आहे. नव्या दमाचा अभिनेता ‘शिवरायांच्या’ भूमिकेत या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. या सोहळ्यात महाराजांच्या रूपातील नव्या दमाचा उमदा अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र याचे प्रथमदर्शन उपस्थितांना झाले. त्याच्या दमदार प्रवेशाने या ऐतिहासिक गाथेबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ‘महारुद्र शिवराय’ गीताचे सादरीकरण कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते चित्रपटातील ‘महारुद्र शिवराय’ हे गीत. दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेल्या या गीताला अवधूत गांधी आणि अमिता घुगरी यांचा स्वर लाभला आहे, तर अवधूत गांधी आणि मयूर राऊत यांनी संगीतबद्ध केले आहे. चित्रपटाच्या पटकथेचे विश्लेषण करण्यासाठी ‘मुगाफी पल्स’ या अत्याधुनिक ॲप्लिकेशनचा वापर करण्यात आला आहे. भव्य निर्मिती आणि वितरण शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही त्यांच्या आयुष्यातील अत्यंत जोखमीची आणि धोरणात्मक रणनीतीची साक्ष देणारी घटना होती. हीच शौर्यगाथा कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज) आणि विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी) यांनी मोठ्या स्तरावर निर्माण केली आहे. पॅनोरमा स्टुडिओज या चित्रपटाचे जगभरात वितरण करणार आहे. दिग्दर्शन: दिग्पाल लांजेकर प्रमुख भूमिका: अभिजीत श्वेतचंद्र प्रदर्शनाची तारीख: ३० जानेवारी