कमी दाबाच्या पट्ट्याचे झाले चक्रीवादळात रूपांतर

नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून त्या वादळाला यास हे नाव देण्यात आले आहे. सोमवारी पहाटेच्या सुमाराला ही प्रक्रिया पुर्ण झाली असून पुढील 24 तासांत हे चक्रीवादळ आणखी वेगवान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पारदीप आणि सागर बेटांच्या मधल्या भागातून हे चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या भूमीत येण्याची शक्यता आहे. 26 मे रोजी हे वादळ मुख्य भूमीवर थडकणार आहे. त्यातून ताशी 155 ते 165 किमी वेगाने वारे वाहणार आहे. त्याचा वेग 180 पर्यंतही जाऊ शकतो. त्यामुळे हे चक्रीवादळ विनाशकारी ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
या आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी दोन्ही सरकारांनी पुरेशी उपाययोजना केली आहे. लष्कर आणि नौदलालाही या आपत्तीत सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवाई दलानेही आपली 11 मालवाहू विमाने आणि 25 हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवली आहेत. वरील दोन्ही राज्यांतील धोक्याच्या भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.


