वाट चुकलेली तलाठी कार्यालये पुन्हा गावात

कर्जत – कर्जत तालुक्यातील धालवडी, पिंपळवाडी, तळवडी, वालवड, बहिरोबावाडी आदी गावांची तलाठी कार्यालये विनाआदेश कर्जत शहरात थाटण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना कार्यालयीन कामे करून घेण्यासाठी कर्जतला हेलपाटे मारावे लागत. गावातून तलाठीच गायब झाल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत.
याबाबत दैनिक “प्रभात’ने “कर्जतमध्ये तलाठी कार्यालयांना फुटले पाय’ या मथळ्याखाली 24 नोव्हेंबरला सचित्र वृत्त प्रसिद्ध केले. या बातमीमधून महसूलच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अखेर तलाठ्यांच्या या कारभाराची तहसीलदार सी. एम. वाघ यांनी गंभीर दखल घेतली. परस्पर कार्यालये सझेच्या ठिकाणाहून स्थलांतरित करणाऱ्या तलाठ्यांना कार्यालये मूळच्या गावी हलविण्याचे लेखी आदेश काढण्यात आले आहेत.
या आदेशामुळे तलाठ्यांना आता आपली कार्यालये मूळच्या गावात सुरू ठेवावी लागणार आहेत. उतारे संगणकीकृत करण्याच्या कामासाठी गावात नेटवर्क उपलब्ध नाही, सर्व्हर डाऊन या नावाखाली तलाठ्यांनी कार्यालये कर्जतला हलविली होती. जुने तहसील कार्यालय परिसरात ही कार्यालये सुरू करण्यात आली होती. कार्यालयात एजंटांकडून कारभार हाकला जात असल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला होता.
या प्रश्नावर दैनिक “प्रभात’ने लक्ष वेधून सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत तहसीलदारांनी तलाठ्यांना आदेश जारी केल्याने पाय सुटलेल्या कार्यालयांना आता घरची वाट धरल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. तहसीलदारांनी 26 नोव्हेंबरला हे आदेश काढले असून तलाठ्यांना दोन दिवसात कार्यालये मुख्यालयात सुरू केल्याबाबतचा लेखी अहवाल सादर करायचा आहे. यात दिरंगाई केल्यास तलाठ्यांना सेवा शिस्त व अपील नियमांनुसार कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या हितार्थ घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
तहसीलदारांनी आदेश दिलेल्या तलाठ्याचे नावे पुढीलप्रमाणे आहे.
एम. टी. ढगे (धालवडी), डी. यु. वास्ते (कुळधरण), ए. आर. कोकाटे (वालवड), एच. बी. नांगरे (कोरेगाव), एस. बी. सरोदे (बहिरोबावाडी), जी. व्ही. सोनवणे (अंबिजळगाव), ए. एन. माने (अळसुंदे), ए. पी. रोडगे (दुरगाव), एस. पी. अनारसे (मंडळाधिकारी, माही), बी. व्ही. सुद्रिक (मंडळाधिकारी, कोंभळी).





