कारखानदारीतून शेतकऱ्यांची लूट थांबविणार – बच्चू कडू

श्रीगोंदा | प्रहार जनशक्ती पक्ष जात, धर्म, पैसा आणि सत्ता हे महायुती आणि महाविकास आघाडीचे समीकरण मोडणार असून हा पक्ष शासनाच्या बजेटचे डिझाईन बदलण्याचे प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घामाचे दाम मिळून देण्यासोबतच कारखानदारीतून शेतकऱ्यांची लूट थांबविणार असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आ. ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी केले.
तिसऱ्या आघाडीचे उमेदवार म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे घनश्याम शेलार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
घनश्याम शेलार यांनी सत्तेत नसताना देखील तालुक्यातील डिंभे, माणिकडोह, कुकडी यासारख्या ज्वलंत प्रश्नांवरती काम करताना या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. मागील निवडणुकीत त्यांना अवघ्या ५ हजार मतांच्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, यावेळी त्यांना प्रहार स्टाईलने २० हजारांच्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचे सांगत सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि जनतेला लुटणाऱ्यांनाच भाजपने उमेदवारी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. श्रीगोंदा तालुक्यात आमदार बबनराव पाचपुते यांनी कारखानदारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पैसे बुडविले असल्याची टीका करत प्रहार देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय मंजूर करून आणणारा एकमेव पक्ष असल्याचे आ.कडू यांनी सांगितले.
यावेळी तिसऱ्या आघाडीचे उमेदवार घनश्याम शेलार यांनी बोलताना मागील चाळीस वर्षांपासून विकासाच्या गप्पा पाहायला मिळत असून तालुका विकासापासून कोसो दूर आहे. तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत मी सातत्याने पाठपुरावा करत असून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी , प्रकाश बेरड, सुरेश सुपेकर, कृष्णा खामकर, विमल अनारसे, लक्ष्मी देशमुख यांच्यासह प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.





