Talegaon Dhamdhere : तळेगावच्या नागरिकांचा जीवघेणा प्रवास थांबणार
Talegaon Dhamdhere : तळेगाव येथे पूल आहे; मात्र पाणी वाढले की त्याच पुलावरून जाण्याचा मार्गच राहत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तळेगाव ढमढेरे : पावसाचा जोर वाढला की नदीला पूर आणि पूर आला की रस्ता बंद! तळेगाव ढमढेरे येथील श्रीनाथ मंदिराजवळील नदीवरील पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याने गावाच्या दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांना जीव मुठीत घेऊन पाण्यातून वाट काढावी लागत आहे. वर्षानुवर्षे असलेल्या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे. दरम्यान, आमदार माऊली कटके यांच्याकडून निधी देण्याचे आश्वासन मिळाल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास थांबणार आहे.
तळेगाव येथे पूल आहे; मात्र पाणी वाढले की त्याच पुलावरून जाण्याचा मार्गच राहत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर मार्गावरील हा पूल गावातील नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावरून विद्यार्थी, शेतकरी, दूध व्यावसायिक, नोकरदार, महिला, दैनंदिन कामासाठी ये-जा करणारे नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात. मात्र, पावसाळ्यात त्यांच्या प्रवासासमोर मोठा अडथळा निर्माण होत आहे.
शाळकरी मुलांना पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ येणे ही परिस्थिती केवळ गैरसोयीची नसून गंभीर सुरक्षेचा प्रश्न आहे. एखाद्या वेळी पाण्याचा प्रवाह अचानक वाढला तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलाची उंची वाढविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. यापूर्वीही या पुलाच्या समस्येबाबत आवाज उठविण्यात आला आहे.
शिष्टमंडळाची आमदारांकडे धाव
दरम्यान, पुलाचे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी माजी उपसरपंच राकेश भुजबळ, मच्छिंद्र भुजबळ, आरंभ उद्योग समूहाचे चेअरमन नवनाथ भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते वसंत भुजबळ, सोमनाथ भुजबळ, खंडू भुजबळ, अनिल चौधरी, अक्षय भुजबळ यांच्या शिष्टमंडळाने शिरूर-हवेलीचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने पुलाची परिस्थिती, जीवघेणा प्रवास, याबाबत आमदार कटके यांचे लक्ष वेधले. पुलाची उंची वाढविण्याच्या कामासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देऊन हे काम मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन आमदार कटके यांनी शिष्टमंडळाला दिले.





