राष्ट्रवादी कॉंग्रेसची गळती सुरूच

आमदार अवधूत तटकरेही शिवसेनेच्या वाटेवर
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसला मागच्या काही दिवसांपासून मोठे धक्के बसत आहेत. त्यात आता आणखी एक धक्क्याची भर पडणार असल्याचे समोर येत आहे. विधानसभा तोंडावर पक्षाचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी पक्षांतर केले. तर आता खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आमदार अवधूत तटकरेही शिवसेनेच्या वाटेवर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. तटकरे यांच्या कुटुंबातीलच सदस्य शिवसेनेत जाण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी तटकरेच भाजपाच्या संपर्कात आहेत. मात्र कोणते ते नंतर सांगू, असे सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, खासदार सुनील तटकरेंचे पुतणे अवधूत तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. लोकसभेतील पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून जुळवाजुळवीचे प्रयत्न केले जात असताना आणखी एक धक्का राष्ट्रवादीला बसणार आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यासंदर्भात तटकरे लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जाते. यामुळेही अवधूत तटकरे हे शिवसेनेत जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.





