“शेवटचं गाणं सुरु झालं आणि…”; ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहिल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई – ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा 28 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनपटात त्यांच्या आयुष्यातील आणि व्यक्तिमत्वातील महत्वाचे पैलू उलगडून दाखवले आहेत. यापूर्वीच या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केली असून अंकुश चौधरीने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत पत्नी प्रतिभा पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील रविवारी हा चित्रपट पाहिला. ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहिल्यानंतर शरद पवारांनी या चित्रपटाबाबत प्रतिक्रियाही दिली आहे. शरद पवार म्हणाले की, “शेवटचं गाणं सुरु झालं आणि मी अंकुशला पूर्णतः विसरून गेलो. मला फक्त शाहीर साबळे दिसले.” असं म्हणत अंकुश चौधरीचं आणि त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. शरद पवार यांच्यासाठी खास चित्रपटाच्या शोचे आयोजन करण्यात आलं होतं.
View this post on Instagram
यावेळी NFDC सेंटर येथे शरद पवारांसोबत पत्नी प्रतिभा पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवार यांनी चित्रपटाच्या टीमची खास भेट घेत सर्वांसोबत मनमोकळेपणाने संवाद साधला आणि चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
दरम्यान, या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 45 लाखांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 60 लाखांची कमाई केली आहे. केवळ दोनच दिवसात चित्रपटाने 1 कोटींचा टप्पा पार केला आहे. याशिवाय सलग सुट्टी आल्याने याचा फायदा चित्रपटाच्या कमाईत होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.





