पिंपरी : कोकणातील हापूस आंबा पिंपरी-चिंचवडच्या बाजारात दाखल झाला आहे. गत दोन महिन्यांपासून सुरु असलेली “हापूस’ची प्रतीक्षा अखेर संपली आहे. यावर्षी मुक्काम ठोकून बसलेल्या पावसामुळे हापूसचा हंगाम लांबला असल्याने डिसेंबरमध्ये येणारा मुहूर्ताचा आंबा यावेळी फेब्रुवारीत बाजारात दाखल झाला आहे. त्यातही सुरुवातीच्या काळात हापूसच्या उत्पादनात मोठी घट झाली असल्याने सध्या हापूसची आवक अत्यंत कमी होत आहे. यामुळे फळांच्या राजाला उच्चांकी भाव मिळत आहे. सध्या हापूस आंबा अडीच ते तीन हजार रुपये डझनने विकला जात आहे. आत्तापर्यंतचा हा सर्वाधिक भाव मानला जात आहे.
चव आणि गुणधर्मामुळे हापूस आंब्याला फळांचा राजा मानले जाते. त्यामुळे या फळाची सर्वांनाच प्रतीक्षा असते. दरवर्षी अगदी डिसेंबर महिन्यापासूनच बाजारात हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात आलेल्या या मुहूर्ताचा आंबा म्हणून व्यापारी त्याची पूजा करून आंब्याच्या हंगामाचे स्वागत करतात. यंदाच्या पावसाळ्यात मात्र थेट नोव्हेंबरपर्यंत पावसाने तळ ठोकला होता. यामुळे हापूस बाजारात येण्यास दोन महिन्याचा उशीर झाला होता. त्यामुळे, दरवर्षी डिसेंबर महिन्यात येणारा हापूस आंबा आता फेब्रुवारी महिना संपत आला तरी पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठेमध्ये दाखल झाला नव्हता.
त्यामुळे व्यापारी वर्ग हापूसची वाट पाहत होता. अखेर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शहरात हापूस आंबा दाखल झाला आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात हापूसची आवकही अगदी कमी प्रमाणात आहे. घाऊक बाजारात अगदी थोड्या प्रमाणात हापूस आंबा दाखल होत असल्याने सध्या हापूसचा भाव चढा आहे. आत्तापर्यंत आलेल्या कच्च्या हापूसला प्रति डझन एक हजार, तर पिकविलेल्या आंब्याला अडीच ते तीन हजार रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
भाव जास्त असल्याने मागणी कमी
सध्या पिंपरी-चिंचवड शहरात हापूस आंबा विक्री साठी दाखल झालेला असला तरी हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे सध्या तरी हापूसला मागणी कमी आहे. त्यामुळे, मागणीनुसारच हापूस आंबा विक्रीसाठी दाखल होत आहे. शहरातील पिंपरी, निगडी प्राधिकरण, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरातून सीझनच्या सुरुवातीपासूनच हापूसला मागणी सुरु होते. पुढील काही दिवसांत आवक वाढल्यानंतर हापूसचे दर कमी होतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.