इंदोरीत गोळ्या घालून कामगाराची निर्घृण हत्या

चिखली परिसरात तणावाचे वातावरण; हल्लेखोरांच्या मागावर पोलीस पथक

इंदोरी – इंदोरी (ता. मावळ) येथे पिस्तुलातून गोळ्या घालून हल्लेखोरांनी चिखली-कुदळवाडी परिसरातील एका कामगाराचा निर्घृण खून केला. इंदोरी-जांबवडे रस्त्यावर मंगळवारी (दि. 21) सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ज्ञानेश्‍वर किसन वरबडे (वय 22, रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी, चिखली) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. ज्ञानेश्‍वर हा चिखली परिसरातील एका अगरबत्ती बनवण्याच्या काराखान्यात काम करीत होता. या प्रकरणी इंदोरीगावचे पोलीस पाटील जयदत्ता शिंदे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदोरी ते जांबवडे गावाच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला अज्ञात इसम रक्‍ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळी जखमीला रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तरुणाच्या डोक्‍यावर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच तळेगाव एमआयडीसी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी, मारुती मडेवाड, सुधीर वडीले, सचिन कचोले, सोरटे यांचे पथक तपास करीत आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×