शिवाजीनगर न्यायालयात लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला अटक; एसीबीची कारवाई

दोषारोपपत्राच्या छायांकित प्रती देण्यासाठी मागितले होती रक्कम 

पुणे – दोषारोपपत्राच्या छायांकित प्रती देण्यासाठी पंधराशे रुपये लाच स्विकारल्याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शिवाजीनगर न्यायालयातील कनिष्ठ लिपिकाला अटक केली. एसीबी दीड वर्षात केलेली ही तिसरी कारवाई आहे. त्यामुळे न्यायालयातील भ्रष्टाचार पुन्हा चर्चेत आला आहे. अटक केलेल्या लिपिकाने पुरावा नष्ट करण्यासाठी कारवाईतील नोटा तोंडात घातल्याची चर्चा न्यायालयीन घटकांमध्ये होती.

प्रसन्नकुमार गणपतराव भागवत (वय 50, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) असे त्याचे नाव आहे. याबाबत बिबवेवाडी येथील 31 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. गुरूवारी (दि. 4) न्यायालयात ही कारवाई करण्यात आली. तक्रारदारांच्या भावाने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्याची प्रत देण्यासाठी तक्रारदारांना लाच मागण्यात आली.

मात्र, लाच देणे तक्रारदारांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. चार क्रमांकाच्या न्यायालयाचा कारभार गुरूवारी पाच क्रमांकाच्या न्यायालयात होता. तेथेच ही कारवाई करण्यात आली. एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अपर पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त वर्षाराणी पाटील यांनी ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.