पुणे : मंगळवार पेठेतील सदा आनंद नगर सोसायटीतील ३,००० हून अधिक रहिवासी विकसकाकडे थकबाकी असल्यामुळे अडचणीत आले होते. त्यांना प्रशासनाच्या मदतीने दिलासा देता आला याचा विशेष आनंद असल्याची भावना प्रभाग २४ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार गणेश बिडकर यांनी व्यक्त केली. सोसायटीला बिडकर यांनी प्रचारादरम्यान भेट दिली. त्यावेळी रहिवाशांनी या सहकार्याबद्दल आभार मानले. बिडकर म्हणाले की, विकसकाने थकबाकी ठेवल्यामुळे सोसायटीला अनेक समस्या भेडसावत होत्या. त्यातच सोसायटीची आर्थिक स्थिती बेताची असल्याने रहिवाशांसमोर अडचणींचा डोंगर उभा होता. तेथील ३,००० रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन गणेश बिडकर यांनी प्रशासनाशी संपर्क साधून पाठपुरावा केला. सततच्या पाठपुराव्यामुळे दीपक मुंडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. यामुळे सोसायटीच्या कारभारात पारदर्शकता आली. सदा आनंद नगर सोसायटीच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी आपण अडीच लाख रुपयांची मदत केली. सोसायटीच्या सभासदांनी त्यात दोन लाखांची भर घालत प्रलंबित कामे पूर्ण केली. दरम्यान, बिडकर यांनी महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पाठपुरावा करून सोसायटीतून तब्बल २५ टन कचरा उपसला, बंद लिफ्ट दुरुस्त करून कार्यान्वित केली. विजेचा खर्च वाचविण्यासाठी सोलर पॅनेलचे काम पूर्ण केले.