महाबळेश्वर – महाबळेश्वर तालुका दोन महिने करोनामुक्त होता. परंतु, काही दिवसांपूर्वी मुंबईतून आलेल्या लोकांनी महाबळेश्वर तालुक्यात करोना आणला. एकापाठोपाठ आठ ते दहा गावांत करोनाचे रूग्ण आढळून आल्याने महाबळेश्वरकरांच्या मनात चिंतेचे वातावरण पसरले. तालुका प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी करोनाला रोखण्यासाठी कसब पणाला लावले. परिणामी महाबळेश्वर तालुक्याने करोनाची वाढत चाललेली साखळी यशस्वीपणे तोडली असून तालुका पुन्हा करोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. पहिल्या टप्प्यात येथील गवळी आळीतील युवक हरिव्दार येथून मुंबईला व तेथून तो सातारा येथे आला. सातारा येथे असतानाच त्याला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. परंतु, हा युवक महाबळेश्वरला आला नसल्यामुळे महाबळेश्वर येथे करोनाचा शिरकाव झाला नाही. परंतु, मुंबई येथून एक महिला पाचगणी येथील सिध्दार्थनगरात आली. ती पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. या महिलेमुळे करोनाचा तालुक्यात प्रवेश झाला. यापाठोपाठ मुंबईतून आलेल्या 22 लोकांच्या ग्रुपमधील कासरूंड, झांजवड, देवळी, पारूट येथील जवळजवळ दहा लोक करोना पॉझिटिव्ह आढळले. परंतु, तालुका प्रशासनाने याबाबत प्रारंभीच योग्य ती खबरदारी घेऊन सर्वांना तळदेव येथील इन्स्टिस्ट्यूट क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल केले. त्यामुळे करोना तळदेवपर्यंतच सीमित राहिला. यानंतर हरचंदी, कोट्रोशी, गोरोशी, गोळेवाडी, कासवंड येथे पाठोपाठ करोनाचे रूग्ण आढळले. तालुक्यात करोनाचा गुणाकार सुरू झाला आणि हे सत्र शहरात येते की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. परंतु, तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांनी याबाबत योग्य ती खबरदारी घेतली. तालुका वैद्यकीय अधिकारी व त्यांची संपूर्ण टीम खबरदारी घेत होता. करोना सेंटरमधील लोकांची योग्य खबरदारी घेण्यात येत होती. तेथून तो फैलावणार नाही, याची काळजी घेतली जात होती. करोनाची साखळी तोडण्यात ज्याप्रमाणे तालुका प्रशासन सजग होते त्याचप्रमाणे गावागावांतील ग्राम समित्यांचेही महत्वाचे योगदान लाभले. समित्यांनी मुंबईवरून आलेल्या लोकांना योग्य रितीने क्वारंटाइन केले. त्यांच्या संपर्कात कोणी येऊ नये, याची काळजी घेतली. पालिका व आरोग्य विभागाच्या पथकांनी परिश्रम घेतले. या सर्वांच्या कामामुळेच करोनाची साखळी तोडण्यात तालुक्याला यश आले. या सर्वांच्या कामगिरीमुळेच तालुका करोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. ही महाबळेश्वरकरांसाठी दिलासादायक बाब आहे.