नव्या नियमांना प्रशासनाकडूनच केराची टोपली
पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने नागरिकांना उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नाकारली. याबाबत पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना सूचनादेखील दिल्या. मात्र, सोमवारी अनेक बसेसमध्ये नागरिक उभे राहून प्रवास करत असल्याचे चित्र होते.
शहरातील शाळा, महाविद्यालयांसह बहुतांश व्यवहार सुरू झाले होते. त्यामुळे पीएमपीच्या प्रवाशांच्या संख्या देखील मागील काही दिवसांपासून वाढत आहे. परंतु, दिवसेंदिवस शहरातील करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या अनुषंगाने बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) उभे राहून प्रवास करण्यास मनाई केली. पण, त्या नियम अंमलबजावणीसाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याचे सोमवारी पहिल्या दिवशी शहरात ठिकठिकाणी दिसून आले.
प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद
बसेसमध्ये केवळ आसन क्षमतेइतक्याच प्रवाशांना परवानगी असल्याने पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सांगितले. मात्र, यादरम्यान काही प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने काही मार्गांवर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनीही “नाद’ सोडला.