पुणे – राज्यातील शेतकरी नवनवीन तत्रंज्ञानाच्या गोष्टी आणि आधुनिक शेती पद्धतींचा वापर करून पिकांचे उत्पादन वाढवत असतो. अश्याच एका युवा शेतकऱ्याने अंजीर या फळाचे उत्पादन घेत लाखोंचे उत्पादन घेतले आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर, सीताफळ लागवडीसाठी प्रसिद्ध असून या तालुक्यातील शेतकरी अभिजित लवांडे यांनी फक्त 30 गुंठ्यांत अंजिर शेती करून तब्बल 14 टन विक्रमी उत्पादन घेऊन 10 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. करोना काळात गेली नोकरी.. अभिजित यांची करोना महामारीच्या काळात नोकरी गेल्याने त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना कृषि विभागातून शेततळ्यासाठी 3 लाख 30 हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. तसेच कृषिविषयक प्रशिक्षण घेऊन शेती करण्यास सुरवात केली. त्यांनी आपल्या शेतात अंजीर 4 एकर, सीताफळ 3 एकर व जांभूळ पाऊण एकर अशा फळझाडांची लागवड केली आहे. अभिजित यांनी 4 एकरामध्ये पुना पुरंदर या वाणाच्या 600 अंजीर झाडाची लागवड केली आहे. खट्टा आणि मिठा अशा दोन्ही बहारात उत्पादन घेतले जाते. खट्टा बहारमध्ये जून महिन्यात छाटणी करुन साधारण साडेचार महिन्यानंतर फळ तोडणीस सुरुवात होते. प्रती झाडापासून 100 ते 120 किलो तर एकरी 13 ते 14 टन उत्पादन भेटते. या बहारात प्रती किलोचा दर 80 ते 100 रुपये मिळतो. तर मिठा बहारमध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात छाटणी व त्यानंतर साडेचार महिन्यानंतर फळ तोडणीस सुरुवात होते. या बहाराच्या फळांस प्रती किलो 85 रुपयांपर्यंत दर मिळतो. अंजीर फळाची बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे पॅकिंग करून प्रतवारीनुसार मालाची विक्री सासवड, पुणे, मुंबई, कोल्हापूर, हैद्राबाद, गुजरात व दिल्ली येथे केली जाते. मागील वर्षी जर्मनीला प्रायोगिक स्वरुपात 100 किलो मालाची निर्यात देखील केली होती. अशा पद्धतीने अभिजित हे दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.