साहित्य संमेलनाचा ‘जयपूर पॅटर्न’

– श्रीनिवास विनायक वारुंजीकर
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर सुरु होत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिलेच संमेलन आहे. त्यानिमित्ताने साहित्य संमेलन संयोजनाच्या जयपूर पॅटर्नविषयीचा हा लेख…
नव्या युगाची नांदी ठरणारा साहित्य संमेलनाचा ‘जयपूर पॅटर्न’ आता अधिकच लोकप्रिय होत आहे. या महोत्सवामधून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याने त्याविषयी मी येथे लिहित आहे. कोणाचाही उपमर्द करण्याचा अथवा टीका करण्याचा हा विषय नसून आधुनिक काळामधले साहित्य संमेलन कसे असायला हवे, याबद्दलचा एक सकारात्मक दृष्टीकोन आपल्यासमोर मांडणे, एवढाच यामागे हेतू आहे. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने कुठपर्यंत जायला हवे आहे, याची एक झलक या ’जयपूर पॅटर्न’ मध्ये दडली आहे, असे वाटते.
गोव्याची राजधानी पणजी येथे दरवर्षी होत असलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असो किंवा केरळमधला बिनाले उत्सव असो, दिल्लीचा बुक बझार असो किंवा कोलकत्याचा बुक फेस्टीव्हल असो, या सर्वच ठिकाणी संवेदनशीलतेला सर्वाधिक प्राधान्य दिलेले दिसते. या सर्वच संमेलनांमध्ये येणारे वक्ते आणि त्यांचे विषय हा मराठीमध्ये एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होईल.
जयपूरच्या संमेलनात ’अध्यक्ष’ नसतो
जयपूरच्या संमेलनात ’अध्यक्ष’ नावाचा प्रकारच नसतो. त्यामुळे कोण या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहे की नाही, ती निवड प्रक्रिया 20 जणांकडे आहे की आणखी कोणाकडे, हा प्रश्नच येथे उरत नाही. त्यामुळे निर्माण होणारे अनेक वाद मूळातूनच संपुष्टात येतात. मग हे संमेलन म्हणजे आचार, विचार आणि सर्जनशीलतेचा जबरदस्त साक्षात्कार बनते. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी साहित्य संमेलनाकडे फिरकू नये, असा वादही अनेकदा रंगल्याचे दिसते. पण जिथे शशी थरूर, दत्तात्रय होसबाळे, जयराम रमेश किंवा कपिल सिब्बल यांच्यासारखे राजकीय साहित्यिक आपला स्वतंत्र ठसा उमटवताना दिसतात, तिथे अशा लोकांना संमेलनबंदी करुन आपण साध्य तरी काय करणार, हा प्रश्न उरतोच. जयपूरच्या संमेलनात फिल्म स्टार्सचे ग्लॅमर हाही एक अविभाज्य भाग असतो. इथेही संबंधित कलाकाराचे पुस्तक गाजले-वाजले आहे का, हेही पाहिले जाते. अशा यादीमध्ये मग ऋषी कपूर, शबाना आझमी, मनिषा कोईराला, लिझा रे यांच्यासह उथा उथुपपासून नीना गुप्तापर्यंतचा समावेशा आढळ्तो. त्यामुळे फिल्म स्टार्सना पहायची संधीही येथे आवर्जून मिळते.
संयोजक टीमवर्क आर्टस
जयपूरचे साहित्य संमेलन हे टीमवर्क आर्टस या संस्थेमार्फत आयोजित केले जाते. या संस्थेमध्ये तीन संचालक आहेत. कादंबरीकार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या नमिता गोखले, रंगकर्मी आणि अभिनेता संजय रॉय आणि इतिहासकार विल्यम डॅरिलिंपल. हे तिघे जण साहित्य संमेलनामध्ये येऊ शकणार्या विषयांचा धांडोळा घेत राहतात. त्यामध्ये चालणारी प्रक्रिया ही संपूर्ण वर्षभर सुरु असते. हे तीनही संचालक आपल्या स्वत:च्या तीन याद्या तयार करतात. या याद्यांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे साहित्यिक, नोबेल पुरस्कार विजेते, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, पुलित्झर पुरस्कार विजेते, बुकर सन्मान विजेते अशा अनेकांची नावे असतात. त्याचबरोबर ज्ञानपीठ विजेते, बिर्ला सन्मान विजेते, साहित्य अकादमी विजेते अशा राष्ट्रीय पुरस्कारांची नावेही त्यामध्ये असतात. हे संमेलन क्लार्क्स आमेर या पंचतारांकित हॉटेलच्या परिसरात आयोजित केले जाते.
विषय कसे ठरतात?
मग या संपूर्ण संचामध्ये नव्या पिढीचे कोणते लेखक काय विषयांवर लिहित आहेत, त्यामधले बेस्ट सेलर रायटर्स कोण आहेत, क्रॉसवर्डसारख्या संस्थांमध्ये कोणत्या प्रकारच्या, जॉनरच्या लेखकांना वाचकांची पसंती आहे, हेही पहात असतात. त्यामुळे प्रचंड गाजलेल्या सलमान रश्दींपासून अगदी अलिकडे लेखन करुन सर्वसामान्यांच्या गळ्यातली ताईत बनलेल्या प्राजक्ता कोलीसारख्या लेखकांपर्यंतची एक यादी तयार केली जाते. याबाबत नमिता गोखले सांगतात की, कोणत्याही वर्षीच्या साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका ठरवताना, त्या लेखकाचे साहित्य, त्याचा आढावा, सर्वंकष मूल्यमापनाची पद्धत आणि त्याचे आंतरराष्ट्रीय स्थान याबद्दलचेच निकष असतात. जयपूर संमेलन म्हणजे डाव्यांचा अड्डा, असे आरोप या संमेलनाबाबत होत असतात. पण इथे कुठल्याही इझमचा विचर केला जात नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आजही तुम्ही पहाल, तर जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलसाठी पुढील वर्षीच्या तारखांची निश्चिती केली जाते. म्हणजे यावर्षी 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान 18 वे संमेलन संपले. बरोबर हे संमेलन संपतानाच पुढील वर्षीच्या तारखांची निश्चिती केली गेली. आता वर्ष 2026 मध्ये जे संमेलन होईल, ते 15 ते 19 जानेवारी 2026 दरम्यान होईल.
असे असतात कार्यक्रम
प्रत्यक्ष कार्यक्रमावेळी सूत्रसंचालक दोन ते तीन मिनिटे व्यासपीठावर वक्त्यांचा परिचय करुन देत असतो. त्यानंतर थेट मुख्य विषयाला हात घातला जातो. ज्या लेखकांची निवड करायची ठरेल, त्या लेखकांना फेस्टीव्हलच्या तारखा आधीच दिल्या जातात. मग फेस्टीव्हलच्या सत्रांमधील कोणता दिवस आणि वेळ अंतिम केली जाते. लेखकाचा सहा ओळीतला परिचय आणि त्याला मिळालेला पुरस्कार, मानसन्मान याविषयीची माहिती घेतली जाते. त्यानुसार संपूर्ण पाच दिवसांचा कार्यक्रम ठरत असतो. आधी एखाद्या फिल्म फेस्टीव्हलमध्ये मिळायचे, तसे सर्व लेखकांचा परिचय असलेले एक जाडजूड पुस्तक मिडीया किटमध्ये मिळायचे. त्यामुळे व्यासपीठावरील वक्त्यांचा परिचय या कार्यक्रमाला आपोआप फाटा दिला जात असे.
मग कोणाची व्यक्तिश: मुलाखत घ्यायची, कोणाला पॅनल डिस्कशनमध्ये आणायचे, कोणाला पुस्तक प्रकाशनासाठी बोलवायचे आणि कोणाची कशी बडदास्त ठेवायची, तेही ठरवले जाते. पाहुणा म्हणून येत असलेल्या लेखकाला, त्याच्या बरोबरच्या व्यक्ती-पीए, पर्सनल असिस्टंट, मिडीया मॅनेजर आणि (सदर लेखक बराच वादग्रस्त असल्यास त्यासाठीचे) बाऊन्सर्स यांची तजवीज करावी लागते. या सर्व व्यक्तींचे त्या त्या वेळचे शेड्युल ठरवणे, स्वतंत्र पत्रकार परिषदेसाठी त्यांना तयार करणे, सहभागी पत्रकारांकडून त्या व्यक्तीसाठीचे प्रश्न तयार ठेवणे आणि वन-टु-वन मुलाखतीसाठी वेळ देणे या गोष्टी ठरवल्या जातात. 2007 मध्ये सलमान रश्दी यांनी जयपूर साहित्य संमेलनासाठी येण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्यांच्या पुस्तकावरील बंदीमुळे, त्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता, त्यांनी जयपूरसह संपूर्ण भारत दौरा रद्द केला होता.
लेखक स्वाक्षरी
अनेकदा एखादे सेशन संपल्यानंतर, त्या लेखकाला कार्यक्रमाच्या ठिकाणी ऑथर साईनसाठी वेगळी सोय करुन दिली जाते. इथे आपल्या चाहत्यांना लेखक पुस्तकांवर स्वाक्षरी देताना दिसतात, सेल्फी काढतात किंवा छायाचित्रणही करतात. अनेकदा ऑथर साईन प्रकारामध्ये इतका वेळ जातो, तरी लेखक न दमता स्वाक्षरी देताना दिसतात. अनेकदा अशा ठिकाणी लागणारी वाचकांची रांग़ तो लेखक किती प्रसिद्ध आहे, याची साक्ष देतात. शिवाय लेखक कितीही मोठा असो, त्याचे वाचकांशी असलेले थेट कनेक्शन येथेच समजून येते.
मिडीया किट
अशा प्रकारे पाच दिवसांच्या कार्यक्रमाचे एक सविस्तर बुकलेट आपल्याला मिडीया किटमध्ये मिळते. फ्रंट लॉन, चारबाग, सुर्य महल, दरबार हॉल, बैठक, जयपूर बुकमार्क आणि बागान अशा सात मंडपांमध्ये होत असलेल्या 260 कार्यक्रमांचा तपशील यामध्ये दिला जातो. पाचही दिवस हे हँडबुक आपल्याजवळ असणे आणि कुठे कोणता कार्यक्रम आहे, हे पहाणे आवश्यक ठरते. लक्षात घ्या, पाच दिवसांत 260 विषय आणि त्यासाठी किमान 400 ते 500 वक्ते.
योग आणि मॉर्निंग रागा
रोजच्या कार्यक्रमांमध्ये सकाळी योेगसाधनेसाठी एक तास दिला जातो. यामध्ये देशातील अनेक नामांकित योगतज्ञांना पाचारण केले जाते. हा उपक्रम सकाळी 8 ते 9 या वेळेत असतो. त्यानंतर मॉर्निंग रागाज अर्थात शास्त्रीय संगीताने उपस्थितांना ताजेतवाने केले जाते. त्यामध्येही देशभरातील अनेक नव्या उभरत्या गायक-वादकांना संधी दिली जाते. सकाळी 9 ते 10 शास्त्रीय संगीताची मैफल संपन्न होत असते. परंपरा आणि नवतेचा संगम असलेले हे दोन्ही उपक्रम आपली लोकप्रियता टिकवून आहेत. मुळात, साहित्य संमेलनाच्या ठिकाणी संगीत कलेला मिळणारे हे उत्तेजन एक नवा परिमाण घडवून आणते.
जयपूर म्युझिक स्टेज
आपण नेहमी म्हणतो की, सर्व कलांच्या मूळाशी संवेदनशीलता महत्त्वाची असते. मग लेखन कलेबरोबरच संगीत, अभिनय, नाट्य अशा कलांना स्थान का दिले जात नाही? म्हणूनच जयपूरमध्ये ‘जयपूर म्युझिक स्टेज’ हा रोज संध्याकाळचा एक अनिवार्य असा कार्यक्रम असतो. म्हणजे सकाळी शास्त्रीय संगीत आणि संध्याकाळी रॅप, रॉकसह म्युझिकल ऑर्केस्ट्रा असा संगम पहायला मिळतो. जयपूरच्या साहित्य संमेलनातील तिसरी संध्याकाळ ही पुन्हा एकदा शास्त्रीय संगीताला वाहिलेली असते. त्यामध्ये जयपूर जवळच्या आमेर फोर्ट येथील विस्तीर्ण पटांगणात खा, प्या आणि संगीत ऐका असा कार्यक्रम असतो. यासाठी सर्व मान्य्वर, लेखक, पाहुणे आणि निवडक पत्रकार आमेर फोर्टच्या मैफिलीत हजेरी लावत असतात. रात्री 9 ते 12 असा कार्यक्रम या किल्ल्यावर होत असतो. हेरिटेज इव्हेंट्स अंतर्गत असा कार्यक्रम आयोजित करताना, येथील निमंत्रितांची संख्या ही अतिशय काटेकोरपणे योजली जाते. या सर्व संमेलनामध्ये सर्वात महत्त्वाची अट असते ती म्हणजे तुमचे किमान एक तरी पुस्तक प्रकाशित झालेले असणे.
इतिहास आणि अध्यात्म
जयपूरच्या संमेलनात इतिहास आणि अध्यात्म याचीही सर्वंकष दखल घेतली जाते. गुलज़ार, जावेद अख्तरपासून अनेक दिग्गज या ठिकाणी आपली पेशकश करत असतातच. देवदत्त पटनाईक इथला लोकप्रिय साहित्यिक आहे. रामायण, महाभारतामधील व्यक्तिरेखा आजच्या काळाशी सुसंगतरित्या मांडणारा साहित्यिक अशी त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. अशा साहित्यिकांना भेटणे, त्यांना प्रश्न विचारणे आणि त्यांच्याबरोबर सेल्फी काढणे हे आजच्या तरुणाईला हमखास आवडते. इथला वाचकवरही असाच तरुण आहे. 80 वर्षे पार केलेल्या भैरप्पांना निरुत्तर करणारा इथला 22 वर्षांचा वाचक लक्षणीय ठरतोे. राधेवरील पुस्तकाबाबत बोलताना असाच एक वाचक म्हणतो की, कुणा लेखकाने राधेचा पती अनय याचा उल्लेख कसा नाही केला?
पर्यावरणाचा प्रश्नही महत्त्वाचाच…
पर्यावरण रक्षण आणि त्यासंदर्भातील चर्चा, जागतिक किर्तीच्या पर्यावरणेप्रेमींशी थेट संवाद, हे विषयही जयपूरच्या संमेलनात उल्लेखनीय ठरतात. त्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, विचारवंत आणि शास्त्रज्ञ या संमेलनात आवर्जून येत असतात. जागतिक तामपानवाढ, त्याचे परिणाम, वरचेवर वितळत असलेली आंतरराष्ट्रीय बर्फरेषा, घटते जंगल, वन्य प्राण्यांचे मानवी जीवनातील हस्तक्षेप, बदलते नदीचे प्रवाह अशा अनेक विषयांवरील तज्ञांना जयपूरमध्ये पाचारण केले जाते आणि सध्या पृथ्वीवरील पर्यावरणाचे सारे संकेत अभ्यासले जातात; समोर मांडले जातात.
कवी संमेलन
कोणत्याही साहित्य संमेलनात कवी संमेलन हा एक महत्त्वाचा भाग असतोच. शिवाय सातत्याने वाढणारी कवींची संख्या ही प्रत्येक भाषेसाठी डोकेदुखी ठरू शकते. जयपूरमध्ये कवी संमेलन हे मुख्या व्यासपाठीवर (फ्रंट लॉन) किंवा दरबार हॉलसारख्या ठिकाणी रंगते. इथे येणारे कवीही निमंत्रित असतात. पूर्वकल्पना दिल्याशिवाय तुम्ही इथे काहीही सादर करु शकत नाही. त्यामुळे येत असलेल्या कवींच्या कवितांची चाळणी आणि दर्जेदार कवितांना प्राधान्य इथे असतेच. तेच कवी… त्याच कविता असा मामला येथे कधीही नसतो.
आजकाल गरज आहे ती अशा साहित्य संमेलनाची. आपले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या अशा नियोजनापासून किमान 100 वर्षे मागे आहे, हे मग सहजच पटून जाते.
अमोल पालेकरांचा मुद्दा
आपल्याकडे अमोल पालेकर या व्यक्तीविषयी बरेच बोलण्यासारखे आहे. अमोल पालेकर यांचे आत्मचरित्र व्ह्युफाईंडर अर्थात मराठीमध्ये ऐवज या नावाने प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी सापडले आहे. जर पालेकर पुण्यातच राहतात, मराठीच्या राजधानीत राहतात तर त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनानंतर त्यांचा समावेश दिल्ली येथे होत असलेल्या एका तरी चर्चासत्रात झाला आहे का? नाही. मराठी साहित्याची विद्यमान स्थिती ही अशी आहे.
पालेकर दिल्लीच्या संमेलनात का नाहीत?
जयपूरमध्ये अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांची प्रकट मुलाखत संजय रॉय यांनी घेतली. त्यानंतर त्यांची सविस्तर पत्रकार परिषदही झाली. वाचक आणि पत्रकारांच्या प्रश्नांना पालेकरांनी सविस्तर उत्तरेही दिली. हे अमोल पालेकर दिल्लीच्या संमेलनात का नाहीत? ‘साहित्य संमेलन म्हणजे बैलांचा बाजार…’ अशी विधानेही पालेकरांच्या नावे जमा नाहीत. मग ज्या अभिनेत्याने तब्बल 80 वर्षांचा आपल्या अभिनय कारकिर्दीचा आलेख आपल्या आत्मचरित्रात मांडला असेल, तर पालेकरांसारखा माणूस दिल्लीच्या संमेलनात असायलाच हवा.

