वाघोली : वाघोली मध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दीड ते दोन हजार रुपये कापून वेतन कमी दिले असल्याबाबतच्या तक्रारी कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे केल्या होत्या. पैसे अचानक कापून घेतल्याने कर्मचाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटला होता. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामदास दाभाडे व इतर यांचेकडे कर्मचाऱ्यांची तक्रार केली होती. सुमारे 200 कर्मचाऱ्यांचा प्रश्न होता. वाघोली आरोग्य विभागाचे अधिकारी व सिद्धिविनायक कंपनीचे अधिकारी आणि वाघोली मध्ये काम करणारे कर्मचारी यांची एकत्रित मीटिंग घेऊन वेतनाचा प्रश्न व त्याविषयी कर्मचाऱ्यांच्या ज्या शंका होत्या त्या मार्गी लावल्या व पुढील काळात वाघोली गावातील रस्ते स्वच्छ कसे राहतील याबद्दलही सूचना केल्या असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी दिली. याशिवाय कंपनीकडून संध्याकाळ पर्यंत नोव्हेंबर महिन्यातील पगारातील जो तांत्रिक कारणामुळे फरक राहिला होता तो आज कर्मचाऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा होईल याची ग्वाही देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवदास पवार,कल्पेश जाचक, सुधीर दळवी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्याची प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत.