पुणे जिल्हा | मांडवगणमधील विषबाधा प्रकरणाचा तपास थंडावला

मांडवगण फराटा, (वार्ताहर)– मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेतील विद्यार्थिनीच्या पाण्याच्या बॉटलमध्ये पाण्यातील विषारी औषधाने विषबाधा झाली. मुलीला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.
वेळीच उपचार केल्याने पुढील अनर्थ टळला असून तिची प्रकृती स्थिर आहे. हा त्रास शाळेच्या वेळेत शाळेत झाल्याने नक्की पाण्याच्या बाटलीत विषबाधा झाली, याबाबत प्रश्नचिन्ह अनुत्तरीत आहे.
या घटनेला बरेच दिवस उलटूनही अजून कोणताच ठोस निष्कर्ष निघाला नाही. या घटनेने शाळेतील विद्यार्थिनी- विद्यार्थी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. घटनेची तक्रार पोलिसांत मुलीच्या पालकांनी दिलेली नाही.
शाळेचे मुख्याध्यापक रामदास चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही शाळेच्या वतीने पोलिसांत लेखी अर्ज केला आहे. याबाबत घटनेची गंभीरता लक्षात घेऊन चौकशी होऊन लवकरात लवकर सत्य समोर यायला हवे होते.
मुख्याध्यापक रामदास चव्हाण यांनी घटनेची माहिती दिली की मुलगी प्रार्थना संपल्यानंतर वर्गात आल्यानंतर तहान लागली म्हणून बाटलीचे झाकण उघडून पाणी प्याली. शेजारी असणाऱ्या मुलीला पाण्याचा उग्र वास आला.
याबाबत मुलांनी ही घटना वर्गशिक्षक याना ताबडतोब सांगितली. शिक्षकांनी मुलीला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वेळीच उपचार सुरु झाल्याने मुलीचे प्राण वाचले. डॉक्टरांनी पाण्यात विषारी औषध मिसळले असल्याचे सांगितले.
विद्यालयातील सीसीटिव्ही घटनेदिवशीच बंद
विद्यालयात ठिकठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परंतु नेमके घटनेच्या दिवशीच कॅमेरे बंद होते.
शाळेत वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वीजपुरवठा करणारी यंत्रणा नेमकी त्याच दिवशी नादुरुस्त असणे, घटनेच्या वेळी वर्गावर शिक्षक नसणे, तक्रार देण्यास विलंब लावणे, पालकांनी पोलिसांत तक्रार न देणे या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत अशी पालकांची अपेक्षा आहे.
भविष्यात अशा प्रकारच्या कोणत्याही अनुचित घटना शाळेत घडू नयेत म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे.
मुलींची सुरक्षा ऐरणीवर
मांडवगण फराटा येथील परिसर हा शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. हजारो मुले- मुली शिक्षण घेत आहेत. नुकतीच मुंबईतील बदलापूर प्रकरण ताजे आहे.
त्यानंतर मांडवगणमधील विषबाधा प्रकरण घडले आहे. घटनेदिवशी सीसीटिव्ही बंद असल्याने हा कारभार संशयास्पद आहे काय, याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. शाळेतील मुलींची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.





