नवी दिल्ली : संसदेत घुसणाऱ्या एक व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो संसदेत 8 नंबरच्या गेटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याची तपासणी केल्यावर त्याच्याकडे 3 जिवंत काडतुसं आढळून आली.
अख्तर खान असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. तो गाझियाबादचा राहणारा आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अख्तर खान संसदेत घुसखोरी करत असताना सुरक्षा सरक्षकांनी त्याला आडवले.
त्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे जिवंत काडतुसे आढळून आली. यानंतर त्याला संसदेत प्रवेश नाकारण्यात आला. आपण ही काडतुसं काढून ठेवण्यास विसरलो, असे त्याने सुरक्षा रक्षकांना सांगितले.
यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला दिल्ली पोलिसांच्या हवाली केले. दिल्ली पोलिसांकडून आता त्याची चौकशी करण्यात येत आहे.