केंद्रात बसून पाहता येणार आगीची तीव्रता

अग्निशामक विभागाला विस्तृत माहिती देणार टॅबची सुविधा
पिंपरी – शहरात आग लागल्यानंतर त्याची माहिती फोन करून अग्निशामक केंद्रामध्ये दिली जाते. त्यानंतर त्या जागेवर पोहचण्यास अडचणी येतात तसेच आगीची तीव्रता फोनद्वारे समजत नसल्याने किती मनुष्यबळ पाठवायचे याचा अंदाज येत नाही. त्यासाठी अग्निशामक दलामध्ये आता टॅबची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये कॉल आल्यानंतर व्हिडीओ पाहण्याची सुविधा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातून येणाऱ्या प्रत्येक फायर कॉलची परिस्थिती अग्निशामक दलाला समजणार आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी काय परिस्थिती आहे, हे जाणून घेऊन त्याप्रकारे त्वरित मदत पोहोचविणे शक्य होणार आहे, अशी माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख किरण गावडे यांनी दिली.
नवीन तंत्रज्ञान वापरुन कामात वेग आणि नागरिकांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी टॅबची सुविधा सुरु करण्याचा विचार केला आहे. शहरात जिथे आग लागली आहे त्या घटनास्थळाची व्हिडिओद्वारे इत्यंभूत माहिती यामुळे प्राप्त होऊन पुढील मदतीसाठी सहाय्य होणार आहे. नागरिकांनी आगीचा व्हिडीओ काढून तो संबंधित नंबरला पाठवायचा आहे. अथवा व्हिडीओ कॉल करुन घटनास्थळाचे व्हिडीओ फोनवरुन दाखवायचे आहे. तसेच घटनास्थळाचे लोकेशनही मोबाईलद्वारे पाठवता येणार आहे. त्यामुळे त्वरित गाडी घटनास्थळी पोहोचणे शक्य होईल.
काही वर्षांपूर्वी मोबाइलची सुविधा नसताना लॅंडलाइनवरुन अग्निशामक दलाला फायरचे कॉल समजत होते. तसेच वॉकी टॉकीची सोयही होती. त्यानंतर मोबाईलद्वारे संवाद साधणे सोयीस्कर झाले. गाडी घटनास्थळी निघाली आहे का हे समजण्याकरता जीपीएस नेव्हीगेशन कर्मचाऱ्यांना आपल्या मोबाईलमध्ये सुरु करावे लागते, मात्र ही सुविधा सुरु झाली की कर्मचाऱ्यांना त्यांचा मोबाईल वापरण्याची गरज नाही.
गाडीचे लोकेशन नागरिकांना आणि प्रत्येक फायर स्टेशनला समजणार आहे. घटनास्थळाच्या जवळ आपली कोणती गाडी आहे ते पाहून त्यांना संपर्क करणे सोयीस्कर होईल. यापूर्वीच्या काळात अग्निशामक दलाला येणारा प्रत्येक फोनचे ऑडियो रेकॉर्डिंग करण्याची सोय होती. त्यामुळे शहरात घडणाऱ्या आगीच्या घटनांची माहिती साठवता येत होती. मात्र आता ज्याठिकाणी आग लागली आहे त्या ठिकाणचे व्हिडिओ साचवता येणार आहे. तसेच कोणत्या वेळी आग लागली, कॉल किती वाजता आला व गाडी किती वाजता रवाना झाली याची इत्यंभूत माहिती साचवता येणार आहे. त्यासाठी हा नवीन उपक्रम राबविण्याच्या विचारात अग्निशामक केंद्र आहे.
नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. चांगल्या गोष्टीसाठी त्याचा जास्तीजास्त वापर करून घेणे आवश्यक आहे. आग लागल्यानंतर प्रामुख्याने नागरिक खूप गोंधळ करतात. त्यामुळे घटनेची पूर्ण माहिती मिळत नाही. अनेक वेळा आग थोडीशी लागलेली असते मात्र नागरिक खूप वाढवून सांगतात. त्यामुळे जास्त मनुष्यबळ पाठवले तर वेळ खर्च होतो, असे होऊ नये तसेच अग्निशामक दलाचा वेग वाढावा यायाठी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
– किरण गावडे, अग्निशामक प्रमुख, पिं.चिं. महापालिका.





