पुणे | राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रीय असून, पुढील 48 तासात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. दरम्यान या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले.
नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) मागील दोन दिवसांपासून उत्तरी सीमा स्थिर असून, येत्या तीन ते चार दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरात राज्य व मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारच्या उर्वरीत भागात,
राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या आणखी काही भाग, पूर्व उत्तर प्रदेशच्या बहुतांश भाग आणि उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर-लडाख-उत्तर पंजाब तर उत्तर हरियाणाच्या काही भागांमध्ये दाखल होण्यास मान्सूनला अनुकूल परिस्थिती आहे.
दरम्यान, समुद्रसपाटीपासून ३.१ किमी उंचीवर कमी दाबाचा पट्टा मध्य गुजरात ते पूर्व विदर्भापर्यंत (मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडामागे) द्रोणीका रेषा दिसून येत आहे. तर समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा आता महाराष्ट्र ते मध्य केरळ दकनारपट्टी पर्यंत आहे.
त्यामुळे राज्यातील कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात तर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील कमाल तापमान पुन्हा 40 अंशावर
राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून दाखल होवूनही अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उकाड्यामध्ये वाढ झाली आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यातील कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. त्यामुळे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.





