भारतीय संघ आजपासून न्यूजीलंडशी तिसरा कसोटी सामना खेळत आहे. मुळातच संघात काही प्रयोग होणार का हेच पाहणे रंजक ठरणार आहे. ज्या प्रकारे दुसऱ्या कसोटीतून कुलदीप यादवला बाहेर बसवले व वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान दिले. त्यानेही आपली निवड सार्थ ठरवताना दोनही डावांत मिळून १० गडी बाद केले. लोकेश राहुलला वगळून अक्षर पटेलला संघात स्थान देण्याच्या प्रयोग संघ प्रशिक्षक गौतम गंभीर करणार का ? हे पाहणे महत्वाचे आहे. न्यूझीलंड संघाने दुसऱ्या कसोटीसह मालिका तर जिंकली आहे. आता भारतीय संघाची प्रतिष्ठा राखण्याचे काम गंभीर आणि भारतीय संघावर आहे. त्यामुळे फलंदाजांवरील जबाबदारी जास्त वाढणार आहे. संघ कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या अपयशाने संघ व्यवस्थापनाला चिंता आहे. या जोडीने म्हणावी तशी कामगिरी या मालिकेत केलेली नाही. त्यामुळे तळातील फलंदाजी जास्त भक्कम करण्यासाठी अक्षर पटेलला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अक्षरनेही आपली उपयुक्तता अनेकदा सिद्ध केलेली आहे. मात्र, त्याला जर संघात स्थान द्यायचे असेल तर संघातून कोणाला बाहेर काढायचे हा प्रश्न आहे. त्यासाठी एकच बदल होऊ शकतो, तो म्हणजे राहुलला डच्चू देण्यात येऊ शकतो. मात्र, हा एक जुगारच ठरेल. पूर्वी महेंद्रसिंग धोनी असे जुगार खेळायचा व त्यात यशस्वीही होत होता. तोच कित्ता गंभीर गिरवणार का हा प्रश्न आहे. संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड होते त्यावेळीही सातत्याने प्रयोग केले गेले. त्यात त्यांना काही प्रमाणात का होईना पण यश मिळत होते. त्यातच टीकाही होत होती. त्यामुळे गंभीरला प्रत्येक पाऊल गांभीर्याने उचलावे लागणार आहे. पूर्वीही त्यांनी जेव्हा राहुलला संघाबाहेर ठेवले तेव्हा त्यांच्यावर भरपुर टीकाही झाली होती. आता एकेक पाऊल फुंकून-फुंकून टाकावे लागणार आहे. हा तिसरा कसोटी सामना जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जर पराभव झाला तर संघाचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीला मिळणार आहे. तसेच इतिहासात पहिल्यांदाच न्यूझीलंडकडून भारताचा व्हाइटवॉश होणार आहे. त्यामुळे रोहित आणि कंपनीला हा सामना जिंकणे ‘जिंकू किंवा मरू’ अशाच पद्धतीने खेळावा लागणार आहे. संघात प्रयोग करुन काय होणार हे प्रत्यक्ष संघ निवड अंतिम झाल्यावरच कळणार आहे. अग्रलेख : पराभवाची चव… हा सामना मंबईच्या वानखेडे स्टेडिमवर होत असून या मैदानावर भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी फारशी चांगली नाही. त्यामुळे लाल मातीच्या खेळपट्टीवर आपले गोलंदाज कशी कामगिरी करतात व फलंदाज त्यांना कशी साथ देतात यावरच सर्वकाही अवलंबून राहणार आहे. कोहलीची कामगिरी या कसोटीतील फरक स्पष्ट करेल व संघातली प्रयोग संघाच्या कामगिरीबाबत परिणामकारक राहणार आहेत.