India vs New Zealand 2nd Test in Pune : – बेंगळुरूमध्ये झालेल्या अनपेक्षित पराभवानंतर गुरुवारपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळविण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून या लढतीत संतुलित संघ घेऊन रोहितसेना मैदानात उतरेल. जागितक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला भारतीय संघ बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात 46 धावांवर बाद झाला झाल्याने न्यूझीलंड संघाने 8 गडी राखून विजय मिळविला होता. एका पराभवाने विश्वकसोटीतील सरासरीमध्ये मोठा फरक पडला असला तरी अजूनही भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. स्थळ : एमसीए स्टेडियम, गहुंजे, पुणे वेळ : सकाळी 9.30 पासून भारतीय संघ नोव्हेंबरच्या मध्यावर ऑस्ट्रेलियामध्ये 5 कसोटींची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे. त्यापूर्वी न्यूझीलंड बरोबरच्या दोन्ही कसोटीमध्ये विजय साकारण्याचे रोहित शर्मा व कंपनीचे पहिले लक्ष्य असणार आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमची खेळपट्टी भारताची परिस्थिती लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या खेळपट्टी काळ्या मातीपासून तयार करण्यात आली असून यावर थोडेही गवत नसते. यामुळे न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांना बेंगळुरुसारखी उसळी मिळणार नाही. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाज विल्यम ओ’रुर्क, मॅट हेन्री आणि टीम साऊदी यांनी पहिल्या लढतीत भारतीय फलंदाजीला वेसण घालण्यात यश मिळविले होते. अशा स्थितीमध्ये भारत टर्निंग ट्रॅक तयार करू शकतो. मात्र आठ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाने भारताला अशाच टर्निंग ट्रॅकवर 333 धावांनी नमविले होते. याच संघाने इंदूरमध्ये देखील भारताचा 9 गडी राखून पराभव केला होता. राहुल किंवा सर्फराज शुभमन गिल तंदुरुस्त होवून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे शुभमन गिल संघात आणल्याने लोकेश राहुल किंवा सर्फराज या दोघांपैकी एकालाच संधी मिळण्याची शक्यता आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, राहुलला अधिक संधी देण्याच्या बाजूने असले तरी बंगळुरूमध्ये सर्फराजने धडाकेबाज १५० धावांची खेळी करून आपली दावेदारी मजबूत केली आहे. भारतीय संघ व्यवास्थापन राहुलच्या बाजूने असले तरी तो गेल्या काही काळापासून धावासाठी झगडत आहे. तर दुसरीकडे सर्फराजने इराणी चषक स्पर्धेत मुंबईसाठी नाबाद २२२ धावांची खेळी केल्यानंतर बेंगळुरूमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये शतक झळकावले होते. गोलंदाजीची डोकेदुखी मंगळवारी ऋषभ पंतने काही काळासाठी यष्टिरक्षण केले. मात्र तो दुसऱ्या कसोटीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही, हे पाहणे गरजेचे आहे. भारताकडे फलंदाजीच्या बरोबरीने गोलंदाजीतही समस्या आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची सातत्यपूर्ण खराब कामगिरी हा चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीमध्ये जोरदार फलंदाजीचा सराव करणाऱ्या आकाशदीपला देखील संघव्यवस्थापन संधी देऊ शकते. फिरकीला साथ देणारी खेळपट्टी असेल तर अश्विन व जडेजा याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी इच्छूक असतील. वॉशिंग्टन सुंदरचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचा अंतिम ११ मध्ये समावेश करण्यात आल्यास भारताची फलंदाजी अजून मजबूत होईल. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने शतकी खेळी केली होती. मात्र, त्याचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना म्हणावे तितके यश मिळाले नाही. IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटी सामन्यादरम्यान पावसाची शक्यता किती? जाणून घ्या, हवामान अहवाल… संघ पुढील प्रमाणे : भारत : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर. न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, मार्क चॅपमन, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र, टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), एजाज पटेल, मॅट हेन्री, टिम साउदी , विल्यम ओ’रुरके, जेकब डफी.