प्रभात वृत्तसेवा वाल्हे – ‘दैनिक प्रभात’ मध्ये उड्डाणपुलावरून जाणाऱ्या एसटी रोखल्या’ या मथळ्याखाली रविवार (दि.१४) वृत्त प्रसिद्ध होताच सासवड आगारा व्यवस्थापनाकडून वाल्हे (ता. पुरंदर) येथील उड्डाणपुलावर दुपारपासून सायंकाळपर्यंत थांबून उड्डाणपुलावरून येणाऱ्या एसटी बस सेवा रस्त्यावरून जाण्यास सांगून पुन्हा उड्डाणपुलावरून आल्यास, कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी सासवड आगारातील वाहतूक निरीक्षक जयेश साळुंखे, वाहतूक नियंत्रक बी. एल. कदम, बोरसे, डी. डी. ताम्हाणे आदींसह विविध अधिकारीवर्ग उपस्थित होते. पुणे – पंढरपूर पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर वाल्हे येथे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस कोणताही बसथांबा नसल्याने परिसरातील प्रवाशांचे हाल अधिकच वाढले होते. नीरा किंवा जेजुरी बाजूकडे प्रवास करण्याकरिता सेवा रस्त्यावर प्रवाशी थांबून राहत होते. मात्र, अनेक एसटी बस उड्डाणपुलावरून जात असल्याने प्रवाशीवर्गाला तासन्तास उन्हात ताटकळत थांबून राहावे लागत होते. त्यामुळे (दि.१३) उपसरपंच सागर भुजबळ, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते शांताराम दुर्गाडे, तानाजी भुजबळ, आकाश भुजबळ, दादा भुजबळ, प्रशांत देशमुख, पोपट पवार, स्वप्निल भुजबळ, नागेश दुर्गाडे, तानाजी भुजबळ आदींसह ग्रामस्थांनी उड्डाणपुलावर थांबून पुलावरून जात असलेल्या एसटी बस पुलाखालून नेण्याची विनंती केल्यानंतर ताटकळत थांबवेल्या प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला. प्रवाशांची दररोजची हेळसांड तात्पुरती टळली तरी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. दरम्यान, प्रभात’मधील वृत्ताने सासवड आगार प्रशासन खडबडून जागे झाले. वृत्ताची तात्काळ दखल घेऊन सासवड एसटी बस आगारा व्यवस्थापनाकडून व त्याच्या सहका-यांनी उड्डाणपुलावर स्वतःच थांबून उड्डाणपुलावरून येत असलेल्या एसटी बस रोखून एसटी बस सेवा रस्त्यावरून घेऊन जाण्याचे आदेश दिले. यापुढे असे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.