पिंपरी | अत्यल्प जनसंपर्काचा बसणार फटका मतदार यादीवर कामच झाले नाही?

पिंपरी, (प्रतिनिधी) – मतदानाच्या दिवशी मतदार यादीतून नावच गायब झाल्याच्या घटना दर निवडणुकीला दिसून येतात. परंतु या लोकसभा निवडणुकीच्या काळात या घटना दरवेळीच्या तुलनेत खूप अधिक होत्या. याचाच अर्थ की राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी यंदा मतदार यादीवर कामच केले नसल्याचे दिसून येते. ऐन निवडणुकीत राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा जनसंपर्क खूप कमी पडल्याचे दिसून येत आहे. याचा फटका बसण्याची शक्यता आता उमेदवारांसह विविध पक्षांच्या मनात धास्ती निर्माण करत आहेत.
कोणत्याही निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष मतदार याद्या घेऊन बसतात. मागील मतदान आणि यंदाच्या मतदार याद्यांच्या तुलना करत आडाखे बांधतात. नवी मतदार यादी आणि मागील मतदार यादी याचे मिलान केले जाते. आपल्या मतदारांची नावे मतदार यादीत आहेत का यावर प्रत्येक प्रभागात एक टीम काम करत असते.
परंतु यंदा ऐन निवडणुकीच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रे फिरुनही यादीत नावे न आढळल्यामुळे परत फिरावे लागले होते. याचा अर्थ की राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यंदा प्रभाग पातळीवर मतदार याद्यांवर काम केले नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
मतदान चिठ्ठ्याच मिळाल्या नाहीत
बहुतेक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या त्यांच्या प्रभागातील त्यांचा मतदार माहीत असतो. त्याच्यापर्यंत मतदानाच्या चिठ्ठ्या पोहचविणे हे प्रचारातील महत्त्वाचे काम समजले जाते. आपले नाव असेलली मतदान चिठ्ठी उमेदवाराने आपल्यापर्यंत पोहचविली, याचे मतदारांनाही समाधान असते.
अनेक मतदार असे असतात ते कुठल्या एका विशिष्ट पक्षाचे कट्टर समर्थक नसतात. दर निवडणुकीत वेगळ्या मुद्यांवर, उमेदवार पाहून ते मतदान करतात. असेच मतदार निवडणुकीचा निकाल ठरवत असतात. अशा मतदारांपर्यंत मतदान चिठ्ठी पोहचविणे गरजेचे असते. परंतु यंदा यातही राजकीय पक्षांनी आळस केल्याचे दिसून येते.
मित्र पक्षच ठरविणार निकाल
मावळ लोकसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेनेचे उमदेवार आमने-सामने होते. या दोन्ही पक्षांकडे शहरात एवढे मोठे संघटन किंवा कार्यकर्ते नाहीत जे घरोघरी पोहचून मतदान चिठ्ठ्यांचे वाटप करु शकतील. यामुळे उमेदवार प्रामुख्याने मित्र पक्षांवर अवलंबून होते. यामुळे मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलेले कामच निकाल ठरविणार असल्याचे स्पष्ट आहे.
जो पक्ष सर्वाधिक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत पोहचवितो, तो विजयी ठरण्याची शक्यता अधिक असते. यंदा मित्र पक्षांनी हे काम आपल्या उमेदवारासाठी केले आहे की नाही? हे 4 जूनलाच स्पष्ट होईल.





