भावाला लिव्हर देण्याची पतीची होती इच्छा ! पत्नीच्या विरोधामुळे ठोठावले न्यायालयाचे दार

नवी दिल्ली – आपल्या भावाचे प्राण वाचावे म्हणून आपले लिव्हर अर्थात यकृत त्याला दान करण्याची एका व्यक्तीची इच्छा होती. मात्र त्याच्या पत्नीचा याला विरोध होता. पती भावाला लिव्हर देण्याच्या निर्णयावर ठाम होता. यासाठी त्याने संबंधित रूग्णालयाशी संपर्कही साधला. मात्र त्याला पत्नीने आक्षेप घेतला. प्रकरण इतके चिघळले की अखेर ते न्यायालयात गेले. त्यावर आता न्यायाधीशांनी आपला निर्णय दिला आहे. त्यात पतीची सरशी झाली आहे.
मध्य प्रदेशातील ही घटना असून येथील उच्च न्यायालयाने पतीच्या बाजूने निकाल दिला आहे. संबंधित व्यक्ती सुदृढ असल्यामुळे त्याच्या पत्नीने घेतलेल्या आक्षेपांकडे लक्ष दिले जाऊ शकत नाही. त्याचे आरोग्य चांगले आहे व त्यामुळेच तो आपल्या लिव्हरचा एक भाग त्याच्या भावाला देण्यासाठी तयार आहे असे न्यायालयाने म्हटले आहे.
दान करू इच्छीणाऱ्या व्यक्तीच्या भावाची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याला तात्काळ लिव्हर ट्रान्सप्लान्टची आवश्यकता आहे. त्याला लिव्हर देण्यासाठी त्याचा भाऊ पूर्णत: तयार होता मात्र मध्येच त्याच्या पत्नीने आडकाठी घातली. पत्नीने संबंधित रूग्णालयाकडेच याला हरकत घेतली असल्यामुळे पुढील सगळे खोळंबले होते. आता यासंदर्भात न्यायालयाने म्हटले आहे की पत्नीने जो इशारा दिला होता तो पतीच्या अधिकारांवर प्रभाव टाकू शकत नाही.
आपले वैवाहिक जिवन यशस्वी रहावे यासाठी पत्नीने घेतलेली हरकत आदर्श स्वरूपाची असू शकते. मात्र लिव्हर ट्रान्सप्लांटच्या अगोदरच आपण असा अनुमान करू शकत नाही की तिच्या पतीचा यामुळे मृत्यू होईल.आताच्या काळात वैद्यकीय क्षेत्राने एवढी प्रगती केली आहे की एका शरिरातील अवयवांचे दुसऱ्या शरिरात यशस्वीपणे प्रत्यारोपण केले जाऊ शकते. पत्नीचा एखाद्या विषयातील समज आणि पतीची त्याबाबतची इच्छा यांची तुलना केली जाऊ शकत नाही. आपले लिव्हर दान करून भावाला वाचवण्याची त्याची इच्छा आहे. सगळी तथ्य आणि परिस्थिती पाहता पतीने घेतलेला निर्णय अवैध असल्याचे म्हटले जाऊ शकत नाही असे न्यायालयाने नमूद केले.




