पुणे : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून छोट्या संवर्गातील बिंदूनामावलीच्या (रोस्टर) तपासणीस असलेली स्थगिती शिथील करण्यात आलेली आहे. या शासन निर्णयाप्रमाणे रोस्टर तपासणी करण्यातील मार्ग खुला झाला आहे. आता विद्यापीठ, महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांच्या भरतीसह विविध शासकीय कार्यालयांमधील नोकरभरतीच्या प्रक्रियेतील अडसरही दूर झाला आहे.
सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी (एसईबीसी) 16 टक्के ऐवजी 13 टक्के आरक्षण लागू करण्यात आले. सुधारित बिंदूनामावलीनुसार 1 ते 30 पदे असलेल्या छोट्या संवर्गामधील एसईबीसी व ईडब्लूएस वर्गासह सरळसेवेची पदे भरताना मागास प्रवर्गातील आरक्षणाची पदे भरण्यासाठी कार्यपद्धती निश्चित नव्हती.
स्थानिक पातळीवरील बिंदूनामावलीची तपासणी व मागासवर्गीय कक्षातील अंतिम तपासणीची प्रक्रियाच थांबविण्यात आली होती. त्यावर 21 ऑगस्ट 2019 रोजी छोट्या संवर्गातील पदे भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून जारी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याला तत्काळ दुसऱ्याच दिवशी स्थगिती देण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले होते.
यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून विद्यापीठातील आरक्षण कक्ष व विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयातील बिंदूनामावली तपासणीची कामे बंदच ठेवण्यात होती. 30 पदांच्या पुढची रोस्टर तपासणी मात्र सुरुच ठेवण्यात आली होती.
मात्र, त्यांची संख्या फारशी नाही. पदोन्नत्यांबाबतही रोस्टर तपासणीची प्रक्रिया सुरूच आहे. छोट्या संवर्गातील बिंदूनामावलील स्थगिती उठवून भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विविध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, उमेदवार, कार्यालये यांनी शासनाकडे केली होती.
विधानपरिषदेचे आमदार दत्तात्रय सावंत, बाळाराम पाटील, श्रीकांत देशपांडे यांनीही शासनाकडे अनेकदा आग्रह धरला होता. याची सामान्य प्रशासन विभागाकडून नुकतीच दखल घेण्यात आले आहे.
आता शासनाच्या निर्णयाप्रमाणे मागासवर्गीय कक्षाकडे रोस्टर तपासणीला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. याबाबत योग्य ते नियोजन करुन संकेतस्थळावर वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.