पिंपरी – महापालिकेच्या रुग्णालयांमधील वॉर्डबॉय, डॉक्टर, परिचारिका यांच्यासह रुग्णांना वापरण्यात येणारे कपडे धुण्यासाठी पाच लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. कपडे धुलाईच्या कामासाठी ठेकेदाराला पुन्हा महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याला स्थायी समिती सभेत मंजुरी मिळाली आहे.
नागरिकांना वैद्यकिय सुविधा पुरविण्यासाठी शहरात 13 दवाखाने आहेत. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयासह इतर रुग्णालये व दवाखान्यांमधील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्यासह रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्याची धुलाई ठेकेदारामार्फत करण्यात येते. त्यासाठी मध्यवर्ती भांडार विभागामार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.
लघुत्तम दराने निविदा सादर केलेल्या विजय ड्रायक्लिनर्स यांच्यासोबत 24 नोव्हेंबर 2016 रोजी करारनामा करण्यात आला. तीन वर्ष कालावधीकरिता रुग्णालयातील कपडे धुण्यासाठी त्यांना 1 कोटी 41 लाख रुपये देण्याच्या खर्चास मान्यता देण्यात आली.या कामाची मुदत 31 ऑगस्ट 2019 रोजी संपुष्टात आली. त्यानंतर त्यांना तीन महिन्यांची पुन्हा मुदतवाढ दिली आहे. विजय ड्रायक्लिनर्स यांना काम करण्यास तयार आहात का, याबाबत विचारणा केली असता त्यांनी आणखी एक महिना काम करण्यास तयार असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.