राज्यस्तरीय पुरस्काराने होणार निढळचा सन्मान

वन विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या गावांचा शासनामार्फत होणार गौरव

पुसेगाव – वन विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या गावांना महसूल व वन विभागाच्यावतीने देण्यात येणारे संत तुकाराम वनग्राम योजनेचे 2017-18 चे राज्यस्तरीय पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील निढळ या आदर्श गावाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार शासनामार्फत जाहीर करण्यात आला आहे. या निवडीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून निढळकरांचे स्वागत करण्यात येत आहे.

राष्ट्रीय वननिती 1988, नुसार वनसरंक्षण आणि वन विकासामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग होण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन ग्रामीणांच्या सहभागातून वनव्यवस्थापन राबविण्याचा निर्णय संदर्भ क्र. 1 वरील दि. 25 एप्रिल 2003 च्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला होता.

या योजनेनुसार वनक्षेत्रामध्ये व वनक्षेत्राच्या सिमेवर असणाऱ्या 15600 गावांपैकी अद्यापपर्यंत 12661 गावांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीने वनांचे संरक्षण करणे व अवैध वृक्षतोड, वनक्षेत्रातील अतिक्रमण, वन वणवा, अवैध चराई इत्यादीस प्रतिबंध करणे अपेक्षित आहे. तसेच त्यांच्याकडे वर्ग केलेल्या वनांचे व्यवस्थापन करणे, ग्रामीण जनतेमध्ये वनांच्या महत्वाविषयी जागृती निर्माण करणे यासारखी कामे संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांमार्फत करण्यात येतात.

सदरहु कामात सतत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांमध्ये चुरस निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या समित्यांना पारितोषिक जाहीर करण्याकरिता संत तुकाराम वनग्राम योजना राबविण्याचा निर्णय संदर्भ क्र. 2 वरील दि. 23 नोव्हेंबर 2006 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. सदरहु शासन निर्णयानुसार संत तुकाराम वनग्राम उत्कृष्ट संयुक्त वनव्यस्थापन समितीस बक्षिस म्हणून रोख स्वरुपात पुरस्कार देवून समित्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

शुक्रवार दि. 19 जुलै 2019 रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करुन सन 2017-18 चे संत तुकाराम वनग्राम स्पर्धेचे पुरस्कार शासनाने जाहीर केले. त्यामध्ये निढळ गावास राज्यातून तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. वनसंवर्धाचे काम गेल्या दोन वर्षापासून निढळ परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)