Pune District : सहकाराच्या शतकपूर्तीचा ऐतिहासिक सोहळा
Pune District : त्यानंतर 10 मे 1926 रोजी राजगुरूनगर येथे जिल्ह्यातील पहिली शाखा सुरू करण्यात आली. बँकेची पहिली सर्वसाधारण सभा 1 ऑक्टोबर 1926 रोजी पार पडली आणि त्यानंतर बँकेच्या कामकाजाला औपचारिक सुरुवात झाली.

राजगुरूनगर : पुणे जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) राजगुरूनगर (खेड) शाखेने शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे. शेतकरी, कष्टकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणारी ही बँकेची पुणे जिल्ह्यातील पहिली शाखा ठरली आहे.
शताब्दी वर्षात पदार्पण करताना बँकेने सहकार, सेवा आणि विकासाचा आदर्श निर्माण केला असून खेड तालुक्याच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पीडीसीसी बँकेची स्थापना 1 सप्टेंबर 1917 रोजी झाली. त्यानंतर 10 मे 1926 रोजी राजगुरूनगर येथे जिल्ह्यातील पहिली शाखा सुरू करण्यात आली. बँकेची पहिली सर्वसाधारण सभा 1 ऑक्टोबर 1926 रोजी पार पडली आणि त्यानंतर बँकेच्या कामकाजाला औपचारिक सुरुवात झाली.
स्थापनेपासूनच बँकेने तालुक्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि विविध घटकांना आर्थिक बळ देण्याचे कार्य हाती घेतले. गावोगावी कर्जपुरवठा आणि आर्थिक सेवा पोहोचवून ग्रामीण भागाच्या सक्षमीकरणात बँकेने महत्त्वपूर्ण योगदान दिले. बँकेच्या उभारणीच्या काळात स्व. बा. प. कोहिनकर, स्व. धोंडिबा लोणारी, स्व. आमदार साहेबराव सातकर, स्व. आमदार नारायणराव पवार, सौ. नूतन आवटे आणि स्व. बाळासाहेब शेटे यांसारख्या सहकार क्षेत्रातील मान्यवरांचे मोलाचे योगदान लाभले. त्यानंतर स्व. नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँकेने विकासाची नवी क्षितिजे गाठली.
आज पीडीसीसी बँक खेड तालुक्याची भाग्यरेषा ठरली असून ग्रामीण भागातील शेतकरी, मागासवर्गीय, बेरोजगार युवक-युवती, महिला बचत गट आणि लघुउद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम सातत्याने करत आहे. अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत महिलांच्या सक्षमीकरणालाही बँकेने चालना दिली आहे. ग्राहकांना आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यातही पीडीसीसी बँक आघाडीवर आहे. सर्व शाखांचे संगणकीकरण, कोअर बँकिंग प्रणाली, एटीएम, मिनी एटीएम, मोबाईल बँकिंग, किसान क्रेडिट कार्ड, मोबाईल अॅप तसेच मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून दुर्गम भागातही बँकिंग सेवा पोहोचविण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण आणि डोंगराळ भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यातही बँक महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
शेतीसाठी अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जे, फळबाग, फूलशेती, हरितगृह, शेडनेट, पोल्ट्री, शेळीपालन, डेअरी, मत्स्यशेती आणि सिंचन योजनांसाठी अर्थसहाय्य दिले जात आहे. याशिवाय शैक्षणिक कर्ज, सोनेतारण कर्ज, गृहकर्ज, वाहन कर्ज, बचत गट आणि लघुउद्योगांसाठी कर्जपुरवठा करून बँकेने तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावला आहे. खेड तालुक्यातील सहकार बँकिंग क्षेत्रात पीडीसीसी बँक दीपस्तंभ ठरली असून समाजाभिमुख, पारदर्शक आणि लोकहितवादी कारभाराचा आदर्श निर्माण केला आहे. शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा जपत पुढील काळातही शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार बँकेने व्यक्त केला आहे.
पीडीसीसी बँकेच्या शताब्दी वर्षानिमित्त तालुकाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून बँकेच्या शंभर वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल सभासद, ग्राहक आणि सहकार क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खेड तालुक्यातील सेवा
सध्या पीडीसीसी बँक खेड तालुक्यात 18 शाखांद्वारे तसेच 106 विविध विकास कार्यकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून सेवा देत आहे. खेड शाखेचे 3 हजार 861 सभासद असून शाखेच्या ठेवींचा आकडा 254 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. शाखेने 28 कोटी रुपयांहून अधिक कर्जवाटप केले असून 2025-26 या आर्थिक वर्षात 5 कोटी 13 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे.
राजगुरूनगर शाखेचा शताब्दी महोत्सव
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजगुरूनगर शाखेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारी (दि. 18) शताब्दी महोत्सव आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे उपस्थित राहणार असल्याची माहिती बँकेचे संचालक तथा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि विभागीय अधिकारी तानाजी दौंडकर यांनी दिली. शताब्दी वर्षानिमित्त बँकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बँकेशी संलग्न असलेल्या 100 वर्षे पूर्ण झालेल्या 14 सहकारी सोसायट्यांचा तसेच काही महिला बचत गटांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.





