पुणे – अवकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर शहराच्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. दोन दिवसांत वाढलेल्या कमाल तापमानाने पुणे चांगलेच तापले असून या हंगामातील सर्वाधिक 40.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शहराच्या मध्यवर्ती भागासह कोरेगाव पार्क आणि तळेगांव ढमढेरे येथे सर्वाधिक 42.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान पोहचल्यामुळे दिवसभर अंगाची लाहिलाही झाली.
मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरवातीलाच अवकाळी पाऊस झाल्याने उन्हाळा जाणवत नव्हता. मान्सूनचे आगमन अवघ्या 20 ते 25 दिवसांवर आले तरी ऊन, पाऊस आणि गारवा असे वातावरण होते. मात्र, अवकाळी पाऊस गेला आणि दोन दिवसांत कमाल तापमानाने 40चा पारा गाठला. नागरिक दिवसभर उकाड्याने हैराण झाले. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात कमाल तापमान 40.1 अंश सेल्सिअस नोंदिवले गेले असले तरी, हवामान केंद्रनिहाय उन्हाचा चटका पाहिला तर कोरेगाव पार्कमध्ये सर्वाधिक कमाल तापमान 42.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर वडगाव शेरी, मगरपट्टा, हडपसर यासह जिल्ह्यातील काही भागात कमाल तापमान 41च्या पुढे होते. दरम्यान, पुढील आठवडा पुण्यातील हवामान कोरडे राहिल, तापमान आणखी वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
कमाल तापमान…
तळेगाव ढमढेरे – 42.9, कोरेगाव पार्क 42.8, वडगावशेरी 42.2, शिरूर 42.1, राजगुरूनगर 41.9, चिंचवड आणि हडपसर प्रत्येकी 41.8, तळेगाव 41.6, मगरपट्टा 40.9, दौंड 40.8, पुरंदर 40.3, शिवाजीनगर आणि पाषाण 40.1, एनडीए 39.9.