जीनिव्हा -जगभरात रविवारी तब्बल 1 लाख 83 हजार 20 नवे करोनाबाधित आढळले. एकाच दिवसातील ती उच्चांकी वाढ ठरली. ब्राझील, अमेरिका आणि भारत या तीन देशांत आढळलेल्या बाधितांमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जागतिक संख्येत भर पडली.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) दिलेल्या माहितीनुसार रविवारी ब्राझीलमध्ये सर्वांधिक 54 हजार 771 नवे करोनाबाधित आढळले. त्याखालोखाल अमेरिकेत 36 हजार 617, तर भारतात 15 हजार 413 बाधितांची भर पडली. आता जगभरातील करोनाबाधितांची संख्या 90 लाखांवर, बळींची संख्या 4 लाख 72 हजारांजवळ पोहोचली आहे. करोना संकटाचा सर्वांधिक फटका अमेरिकेला बसला आहे. त्या देशात 23 लाखांहून अधिक बाधित आहेत. करोना संसर्गाने आतापर्यंत अमेरिकेत 1 लाख 22 हजारांहून अधिक बाधित दगावले आहेत.
बाधित आणि बळींच्या संख्येतील जागतिक क्रमवारीत ब्राझील दुसऱ्या स्थानी आहे. त्या देशाने बाधितांच्या संख्येत 10 लाखांचा टप्पा याआधीच ओलांडला आहे. ब्राझीलमध्ये 50 हजारांहून अधिक बाधित मृत्युमुखी पडले आहेत. रशियात जवळपास 6 लाख बाधितांची नोंद झाली आहे. बाधित संख्येच्या जागतिक क्रमवारीत भारत चौथ्या स्थानी आहे.