नवी दिल्ली – महामार्ग व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारी यंत्रणा देशात 2026 अखेर कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मल्टीलेन फ्रीफ्लो व्यवस्था अंमलात येणार आहेत. त्यामुळे महामार्गावर टोल कलेक्शनसाठी वाहनधारकांना जास्त वेळ लागणार नाही, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली. या यंत्रणेमुळे वार्षिक पातळीवर दीड हजार कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. टोल संकलन सहा हजार कोटी रुपयांनी वाढण्यास मदत होईल. अगोदर टोल घेण्यासाठी तीन ते दहा मिनिटांचा कालावधी लागत होता. आता फास्टटॅगमुळे 60 सेकंदात टोल संकलन होते. यामुळे 5,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे. मल्टीलेन फ्रीफ्लो व्यवस्थेमुळे टोल प्लाझावरून वाहने 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाऊ शकतील. यामुळे कसलीही टोलचोरी होऊ शकणार नाही आणि रस्त्यावरील वाहतुकीचा वेग वाढेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेचाही वेग वाढण्यास मदत होईल, असा दावा गडकरी यांनी केला.