तालिबानी राजवटीत हक्कानी नेटवर्कही सहभागी होणार

काबूल – अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून सत्तेची जुळवाजुळव केली जात आहे. त्यासाठी तालिबानचे म्होरके विविध नेत्यांबरोबर चर्चा करत आहेत. सत्तास्थापनेच्या या प्रक्रियेमध्ये घातक हक्कानी नेटवर्कदेखील सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे.
हक्कानी नेटवर्ककडून अफगाणिस्तानमध्ये अनेक भीषण दहशतवादी हल्ले केले गेले आहेत. सामान्य नागरिक, सरकारी अधिकारी आणि सुरक्षा फौजांवरही हक्कानी नेटवर्ककडून हल्ले केले गेले होते. अफगाणिस्तानात घातक दहशतवादी गट म्हणून समजल्या जाणाऱ्या हक्कानी नेटवर्कने म्हणूनच सत्तेतील सहभागाचा दावा केला आहे.
तत्कालिन सव्हिएत रशियाविरोधातल्या युद्धात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या जलाउद्दीन हक्कानीने या गटाची स्थापना केली होती. मुजाहिदीनांना अमेरिका आणि पाकिस्तानकडून शस्त्रे पुरवली जात असताना जलाउद्दीन हक्कानी या युद्धातील प्रमुख लढवय्या होता.
रशियाने अफगाणिस्तानातन माघार घेतल्यावर जलाउद्दीन हक्कानीने लादेन आणि अन्य विदेशी दहशतवाद्यांबरोबरचे संबंध अधिक घनिष्ट केले. 1996 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यावर हक्कानी तालिबानच्या जवळचा बनला. तालिबानी राजवटीमध्ये तो मंत्री देखील बनला होता. 2018 मध्ये दीर्घ आजाराने त्याचा मृत्यू झाल्याचे तालिबानने जाहीर केले होते. मात्र हक्कानी नेटवर्कने तालिबानबरोबर राहूनही आपली स्वायत्तता कायम राखली होती.
आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणणे ही हक्कानींची कार्यशैली आहे. प्रचंड स्फोटकांनी भरलेल्या कार, ट्रक आपल्या लक्ष्याला धडकावून यांच्याकडून घातपात केला जात असतो. अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर हक्कानींकडून हल्ले केले गेले आहेत. तत्कालिन अध्यक्ष करझाई यांच्यावरही हक्कानींकडून प्राणघातक हल्ला झाला होता.
पाकिस्तानच्या लष्करी गुप्तहेरांशी हक्कानींचे जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते आहे. मात्र पाकिस्तानने हक्कानीबरोबरचे संबंध नाकारले आहेत. लध्या या संघटनेचे नेतृत्व सिराजुद्दीन हक्कानीकडे आहे. हक्कानी नेटवर्कला अमेरिकेने विदेशी दहशतवादी संघटना म्हटले आहे. या संघटनेवर संयुक्त राष्ट्राकडूनही बंदी घालण्यात आली आहे.

